नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कायदे रद्दच करा, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. कडाक्याच्या थंडीत गेल्या महिन्याभरापासून केंद्राच्या कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकरी आंदोलन करत आहेत. याच दरम्यान देशभरातून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जात आहे. अनेक जण पुढाकार घेत आहेत. शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. शेतकऱ्यांसाठी ट्रकभर अननस पाठवण्यात आले आहेत.
केरळमधील अननस उत्पादक शेतकऱ्यांनी दिल्लीतील आंदोलनकर्त्यांसाठी मोफत ट्रकभर अननस पाठविले आहेत. ''पायनापल सिटी'' म्हणून मधुर अननसासाठी प्रसिद्ध असलेल्या एर्नाकुलम जिल्ह्यातील वाझाकुलम या ठिकाणाहून गुरुवारी रात्री तब्बल 16 टन अननसाचे ट्रक दिल्लीला पाठविण्यात आले. केरळचे कृषिमंत्री व्ही.एस. सुनील कुमार यांच्या हस्ते हे ट्रक आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी रवाना करण्यात आले. दिल्लीतील केरळचे खासदार हे अननस आंदोलनस्थळी वाटणार आहेत. केरळच्या शेतकऱ्यांच्या या उपक्रमाचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे.
सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केरळच्या शेतकरी बांधवांनी पाठविलेली ही भेट मोहक आणि मधुर ठरावी, अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. तसेच सिंघू बॉर्डरवर शकील मोहम्मद कुरेशी कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति असलेला आदर व्यक्त करत आहेत. शकील मोहम्मद कुरेशी शेतकऱ्यांना मोफत स्वेटर वाटत आहेत. दररोज सकाळी आठ वाजता कुरेशी रस्त्याच्या कडेला आपला स्टॉल लावतात आणि स्थानिक ठिकाणी तयार केलेले स्वेटर नव्या केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली-हरयाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ते मोफत वाटत आहेत. कुरेशी यांनी शेतकऱ्यांना आतापर्यंत 300 जॅकेट्स आणि स्वेटरचं वाटप केलं आहे. कुरेशी हे गरम कपडे विकण्याचे काम करतात. ते दररोज 2500 रुपयांची कमाई करतात.
कडक सॅल्यूट! सिंघू बॉर्डरवर कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांना 'ही' व्यक्ती वाटते मोफत स्वेटर
कुरेशी यांचे वडील हे उत्तर प्रदेशातील बागपत येथील शेतकरी आहेत. "माझे वडील एक शेतकरी आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य किती कठीण असते हे मला माहीत आहे. शेतकरी आपल्या पिकाला उचित किंमत मिळावी यापेक्षा अधिक काहीच मागत नाहीत" असं कुरेशी यांनी म्हटलं आहे. ते आपली पत्नी आणि मुलांसह उत्तर दिल्लीतील नरेला येथे राहतात. कुरेशी यांनी गरम कपड्यांच्या किंमतीविषयी काही बोलायला नकार दिला. हे चांगल्या कामासाठी माझं योगदान आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी समाजातील विविध वर्गांमधून विविध प्रकारची मदत पोहोचत आहे.