नवी दिल्ली - भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसचा फैलाव होत आहे. त्यातच भारतीय आरोग्य यंत्रणा तितकीशी मजबूत नसल्यामुळे देशावर मोठे आरोग्य संकट असल्याचे बोलले जात आहे. देशात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा बचाव होण्यासाठी आवश्यक असलेले सर्जिकल साहित्य कमी पडत आहे. असे असताना भारतातून सर्बियाला सर्जिकल साहित्याची निर्यात करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भारतात कोरोनापासून वाचण्यासाठीच्या सर्जिकल साहित्याची कमतरता आहे. अशा स्थितीत भारताकडून सर्बियाला ९० टन साहित्य पाठवण्यात आले आहे. युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या सर्बियन विंगने या संदर्भात ट्विट केल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. भारतातील साहित्याच्या जोरावर कोरोना व्हायरस बाधित देशातील आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढा देत आहेत. मात्र भारताच्या आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात अशी कोणताही महिती नसल्याचे म्हटले आहे.
केरळमधील एका कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की, कोरोना व्हायरसविरुद्ध जगभरात सुरू असलेल्या लढ्यात मदत म्हणून सर्जिकल हँडक्लोजचे ३५ लाख जोडे सर्बियाला पाठविण्यात आले आहेत. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमीटेडच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ९० हजार ३८५ किलोग्राम वजनाचे हँडक्लोजचे ७ हजार ९१ डब्बे बोईंग ७४७ मालवाहक विमानाने सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे पाठविण्यात आले आहे. निर्यात करणाऱ्या कंपनीचे नाव सेंट मेरीज रबर्स लिमीटेड आहे. सर्बियात आतापर्यंत ५०० लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून सात लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात सर्जिकल साहित्याची कमतरता भासत आहे. अशा स्थितीत इतर देशांना सर्जिकल साहित्य निर्यात केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.