नीती आयोगाने सोमवारी हेल्थ इंडेक्स जारी केला आहे. यामध्ये दक्षिणेकडील राज्यांनी बाजी मारली आहे. महत्वाचे म्हणजे देशात आजपर्यंत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण ज्या राज्यात सापडले त्या राज्याचा हेल्थ इंडेक्समध्ये पहिला क्रमांक आला आहे. केरळनंतर तामिळनाडू आणि तेलंगाणाचा नंबर लागतो. देशाचे सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशची परिस्थिती सर्वात खराब आणि स्थान खालचे असल्याची आकडेवारी निती आयोगाने मांडली आहे.
उत्तर प्रदेशचा नंबर मोठ्या राज्यांमध्ये 19 वा आणि बिहारचा 18 वा आहे. तर छोट्या राज्यांमध्ये मिझोराममध्ये चांगली आरोग्य सेवा दिली जाते. दुसऱ्या क्रमांकावर त्रिपुरा व नागालँड हे सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. केंद्रशासित प्रदेशांमध्ये दादरा नगर हवेली पहिल्या क्रमांकावर आहे, तर चंदीगढ हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे. महत्वाचे म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मोहल्ला क्लिनिक सुरु करून चांगली आरोग्य सेवा देत असल्याचा दावा केला होता.
नीती आयोगानुसार हेल्थ इंडेक्ससाठी 4 फेऱ्यांमध्ये सर्व्हे करण्यात आला आहे. यानुसार मार्क देण्यात आले आहेत. चारही फेऱ्यांमध्ये केरळ सर्वात पुढे आहे. केरळचा स्कोअर 82.20 आहे. दुसऱ्या क्रमांकावरील तामिळनाडूचा स्कोअर 72.42 आहे. तिसऱ्या क्रमांकावरील तेलंगानाचा स्कोअर 69.96 आहे. चौथ्या क्रमांकावरील आंध्र प्रदेशचा स्कोअर 69.95 आहे. तर महाराष्ट्राचा स्कोअर 69.14 असून राज्य हेल्थ इंडेक्समध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशचा स्कोअर 30.57 आहे. नीती आयोगाने 2019-20 चा हेल्थ इंडेक्स जारी केला आहे.