नवी दिल्ली: व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो-कोट्यवधीची किंमत मिळते. केरळच्या मच्छिमारांच्या हाती कोट्यवधी रुपयांची व्हेल माशाची उलटी लागली आहे. केरळमधील विझिंगम 28.400 किलो एम्बरग्रीस(व्हेल माशाची उलटी) सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या उलटीची आंतरराष्ट्रीय बाजारात 28 कोटी रुपये किंमत आहे. या मच्छिमारांनी ही उलटी स्वतःजवळ न ठेवता, ती प्रशासनाकडे सुपूर्द केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मच्छिमारांच्या एका समुहाला ही उलटी सापडली. पण, त्यांनी ती तात्काळ कोस्टल पोलिसांच्या ताब्यात दिली. यानंतर ते एम्बरग्रीस वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले असून, तेथून त्याला राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी (RGCB) येथे तपासासाठी पाठवले आहे. 1 किलो व्हेलच्या उलटीची किंमत बाजारात 1 कोटी रुपये आहे. या अर्थाने मच्छिमारांना मिळालेल्या एबरग्रीसची किंमत 28 कोटींहून अधिक होती.
समुद्रातले सोनेएम्बरग्रीसला त्याच्या मूल्यामुळे समुद्रातले सोने म्हटले जाते. गेल्या वर्षी केरळ पोलिसांनी सुमारे 30 कोटी रुपये किमतीचे अंबरग्रीस जप्त केले होते. हा तपकिरी मेणासारखा घन पदार्थ असतो. पूर्वेकडील देशांमध्ये एम्बरग्रीसचा औषध आणि मसाले म्हणून वापर केला जातो. तर पश्चिमेकडील देशांमध्ये त्याचा उच्च दर्जाच्या परफ्यूमचा सुगंध दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी वापरला जातो.