कोट्टायम/इडुकी: शनिवारपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे आतापर्यंत दक्षिण आणि मध्य केरळमध्ये 18 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यांच्या डोंगराळ भागात भूस्खलनानंतर 22 जण बेपत्ता झाल्याची भीती आहे. पावसामुळे बिघडलेली परिस्थिती पाहता राज्य सरकारने मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराची मदत घेतली आहे. पावसामुळे राज्यातील पूर परिस्थिती पाहता सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
आजही अतिवृष्टीचा इशारामुसळधार पावसामुळे केरळच्या इडुक्की आणि कोट्टायम जिल्ह्यात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. हवामान विभागाने रविवारीही मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, त्रावणकोर देवासम मंडळाने भगवान अयप्पाच्या भक्तांना 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी सबरीमाला मंदिरात न जाण्याचे आवाहन केलं आहे. तिकडे राज्यातील पंबा नदीतील पाण्याची पातळी चिंताजनक पातळीपर्यंत वाढत आहे.
मुख्यमंत्र्यांची आपात्कालीन बैठककेरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पावसामुळे राज्यातील बिघडलेली परिस्थिती पाहता शनिवारी रात्री तातडीची बैठक बोलावली. बैठकीदरम्यान ते म्हणाले की राज्याच्या काही भागात परिस्थिती खरोखर गंभीर आहे. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आम्ही लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेतली आहे. जिल्ह्यांमध्ये मदत शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. राज्य सरकार सर्व धरणांच्या पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोट्टायम, पठाणमथिट्टा आणि इडुक्की हे तीन जिल्हे मुसळधार पावसामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.
पाच जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. कोट्टायम आणि पठाणमथिट्टा जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून शुक्रवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे.