Kerala floods: कोची, मुंबईला पुरापासून वाचवण्यासाठी नेदरलँड्स पॅटर्न वापरता येईल का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 12:58 PM2018-08-17T12:58:10+5:302018-08-17T13:02:50+5:30
Kerala floods: नेदरलँडसने आपल्या देशाला पुरापासून आणि समुद्राच्या पाण्यापासून कसे वाचवले?
मुंबई-केरळमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे सर्व रस्त्यांना व मोकळ्या जागांना नद्यांचे स्वरुप आले आहे. किनारपट्टीच्या शहरांमध्ये पावसाळ्यात पुरामुळे अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण होते. त्यामुळे मुंबई किंवा कोचीसारख्या शहरांमध्ये प्रशासन हवालदिल होते, तसेच लोकांच्या संपत्तीचे नुकसानही होते. अनेक लोकांचे प्राण जातात.
The biggest #Storm Surge Barrier of the world #Maeslantkering in #Port of #Rotterdam#Rozenburg#Netherlands closed to protect mainland for flooding. pic.twitter.com/1paUkkzPcX
— Richard Telder (@portries) January 3, 2018
समुद्राचे पाणी आत शिरण्याचा धोका जगातील अनेक शहरांना आहे न्यूयाँर्क, व्हेनिस ही शहरेद्धा पाण्याच्या काठावरच आहेत. पण समुद्राचे पाणी शहरात भरून नुकसान होण्याचा सर्वात मोठा धोका नेदरलँड्सला आहे. तरिही या देशाने आपल्या राजधानी अँमस्टरडँमसह इतर शहरांना गेली अनेक शतके पाण्यापासून सुरक्षित ठेवले आहे.
नेदरलँड्स हा देश चक्क समुद्रसपाटीच्या पातळीपासून खाली आहे. या देशाचा दोन तृतियांश प्रदेशाची उंची समुद्रसपाटीपासून केवळ तीन फुट किंवा त्याहीपेक्षा कमी आहे. अॅमस्टरडॅम, रॉटरडॅम आणि हेग या तिन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये पाणी भरण्याचा सतत धोका असतो. समुद्रसपाटीपासून जमिन खाली असल्यामुळे नेदरलँडमध्ये गेली हजारो वर्षे पूर येत असल्याचा इतिहास असून तितकीच वर्षे ते पाण्याशी झगडत आहेत. समुद्राचे पाणी आत येऊ नये यासाठी त्यांनी डाइक म्हणजे रुंद बांध बांधायला सुरुवात केली.
१९१६ साली झोडोर्झे शहरात आलेल्या पुरामुळे डच लोकांनी एक मोठा डाइक बांधून पाणी अडवले. या बांधावरुन रस्ताही जातो व त्याने अडवलेल्या पाण्यामुळे मोठा जलाशयही तयार झाला आहे. १९३२ साली हा डाइक बांधून तयार झाला. काही डच तज्ज्ञांनी व नाँर्वेजियन कंपन्यांनी मुंबईचा कोस्टल रोडही असाच किनाऱ्यापासून पाचशे मीटर पाण्यात डाइकवर बांधावा अशी सूचना केली होती. हा डाईक पूर्ण बांधावा लागणार नाही, त्यासाठी काही नैसर्गिक खडकरचनेचाही आधार म्हणून वापर होईल तसेच किनारा व डाइक यामधील जागेचा वापर होल्डींग पाँडसारखा वापर होईल त्यात पुराचे पाणी वाहून जाता येईल व शहराला धोका पोहोचणार नाही.
डचांना समुद्राच्या पाण्याबरोबर समुद्राला वाहात जाऊन मिळणाऱ्या नद्यांपासूनही धोका आहे. त्यामुळे नदी पात्राजवळ रुम ऑफ वॉटर म्हणजेच थोडी मोकळी जागा सोडण्यात आली. नदीला वळणे जास्त असली की तिचा वेग कमी होतो म्हणून तशीही योजना करण्यात आली. तसेच नदीच्या गाळाच्या मैदानाची खोली वाढवण्यात आली. गाळाची मैदाने उथळ व सपाट असल्यामुळे तेथे पाणी साठण्याचा धोका जास्त असतो, त्यांची खोली वाढवून तो धोका कमी केला गेला. नदीला मिळणाऱ्या लहान प्रवाहांचे व उपनद्यांची खोलीही वाढवून पाणी जास्तीत जास्त पात्रात राहावे, ते बाहेर येऊ नये अशी योजना केली गेली. याबरोबरच मेस्लांटकेरिंग नावाचे लोखंडी गेटही बांधून समुद्राचे पाणी शहरांमध्ये घुसू नये अशी व्यवस्था केली गेली.
डचांसाठी पाणी भरणे हे नेहमीचे व प्राचिन संकट असल्यामुळे डाइक बांधायला ११ व्या शतकातच सुरुवात झाली होती. तसेच जमिन कोरडी राहावी म्हणून पाणी उपसण्यासाठी पवनचक्कीचा वापर केला जाऊ लागला. सर्वात पहिली पवनचक्की १५ व्या शतकात बांधली गेली. आज या पवनचक्क्या ऐतिहासिक सहलींची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. नेदरलँड्सने किनाऱ्याची होणारी सततची धूप ओळखून वाळूचे पुन्हा संचयन व्हावे यासाठू कृत्रिमरित्या वाळू किनाऱ्याजवळ टाकायला सुरुवात केली. यामुळे किनाऱ्याची होणारी धूप कमी झाली व सतत हे संचयन केल्यामुळे हानी टळली.
The Netherlands and American regions at risk of floods and storm surge actively exchange expertise on how to properly manage water. Learn more about our #WaterManagement: https://t.co/bKAc5Q3tvtpic.twitter.com/IBXzOY9oDp
— Netherlands Embassy 🇺🇸 (@NLintheUSA) June 27, 2018
स्टॉर्म सर्ज वॉर्निंग सर्विस
नेदरलँड्सने स्टॉर्म सर्ज वॉर्निंग सर्विस नावाने एक सेवा सुरु केली आहे. यात पुराची सूचना , तीव्रता आधीच समजत असल्याने लोकांना तशा सूचना देऊन सुरक्षित जागी हलवण्यात येते. किनारा व डाइकच्या जवळ राहणारे लोक आधी सुरक्षित ठिकाणी नेले जातात. नेदरलँड्सने नदी जवळचे काही प्रदेश संभाव्य पुराच्या जागा म्हणून रिकाम्या केल्या आहेत. पुराच्या वेळेस पाणी या प्रदेशात पाणी साठावे आणि इतर भागात पसरू नये असा त्यामागचा हेतू आहे.