तिरुअनंतपुरम - मुसळधार पावसाने केरळमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. केरळमधील पूरप्रकोपात आतापर्यंत ३२४ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख नागरिक बेघर झाले आहेत. केरळमध्ये १०० वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाने एका दिवसात तब्बल 106 जणांचा बळी घेतला आहे. जोरदार पावसामुळे आतापर्यंत 8 हजार कोटींचं नुकसान झालं आहे.
केरळमध्ये पुराने थैमान घातले असून, सातत्याने कोसळत असलेला पाऊस आणि आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान, केरळमधील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री राज्यात दाखल झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळच्या पूरस्थितीची हवाई पाहणी करणार आहेत.
केरळमधल्या पथनमतित्ता जिल्ह्यातील रन्नी, अरनमुला, कोझेनचेरी गावांतील लोक मुसळधार पावसामुळे घरातच अडकून पडली आहेत. पथनमतित्ता, एर्नाकुलम आणि थरिस्सूर जिल्ह्यांतील अनेक भागात पाण्याची पातळी 20 फुटांहून अधिक आहे. त्यामुळे गल्लीबोळाला नद्यांचं स्वरूप आलं आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य केंद्रीय मंत्र्यांकडे जास्तीची मदत मागितली आहे. दरम्यान, दिल्ली आणि पंजाब सरकारने केरळला प्रत्येकी 10 कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे.