तिरुवनंतपुरम - केरळमधील पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी ( 28 ऑगस्ट ) तिरुवनंतपुरम येथे दाखल झाले आहेत. देशातील कानाकोपऱ्यातील नागरिकांकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. यादरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडूनही मदतीत हातभार लावण्यात आला. राहुल गांधी यांनी स्वतः लक्ष घालत केरळकडे रवाना होणाऱ्या एअर अॅम्ब्युलन्सला मार्ग मोकळा करुन दिला. वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी जाणाऱ्या एअर अॅम्ब्युलन्सला त्यांनी प्राधान्य देत त्यांचा मार्ग मोकळा करुन दिला.
पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी केरळच्या दौऱ्यावर आहेत. येथे दाखल होण्यासाठी त्यांचं खासगी चॉपर चेंगनूर हेलिपॅडहून उड्डाण भरणार होते. याचदरम्यान, येथून एक एअर अॅम्ब्युलन्सदेखील केरळकडे रवाना होणार होती. यावेळेस राहुल गांधी यांनी स्वतः काही काळ प्रतीक्षा करत एअर अॅम्ब्युलन्ससाठी मार्ग मोकळा करुन दिला. या एअर अॅम्ब्युलन्सनं उड्डाण भरल्यानंतर राहुल गांधी आपल्या चॉपरमध्ये बसले आणि केरळकडे रवाना झाले.
( केरळच्या मदतीसाठी 'गुगल'ची धाव; सात कोटींची मदत जाहीर )