तिरुवनंतपुरम : केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे अनेक लोक बेघर झाले असून आतापर्यंत 357 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी बचाव शिबिरात अनेक नागरिकांनी आश्रय घेतला आहे. तसेच, लोकांना सुरक्षितस्थळी पोचविण्याचे काम येथील प्रशासन, पोलीस, मच्छीमार आणि एनडीआरएफचे जवान यांच्याकडून युद्धपातळीवर राबविले जात आहे.
दरम्यान, सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक मच्छीमार स्वत: पायरी बनून महिला आणि मुलांना एनडीआरफच्या बोटीत बसण्यासाठी मदत करत आहे. जैसल केपी असे या मच्छीमाराचे नाव आहे. जैसलच्या या मदतकार्यामुळे सर्वच स्तरावरुन त्याचे कौतुक करण्यात येत आहे. केरळमध्ये लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी जवळपास 600 मच्छीमार मदतकार्य करत आहेत.
सध्या केरळची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शुक्रवार आणि शनिवारी पाऊस कमी झाल्याने 14 जिल्ह्यांना दिलेला रेड अलर्ट हटविण्यात आला आहे. पाऊस ओसरल्याने बचावकार्याला वेग आला असून, कोची विमानतळावरून 8 दिवसांनंतर व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत.