तिरुअनंतपूरम: केरळमध्ये सलग आठवडाभर पडणाऱ्या पावसामुळे अर्धे राज्य पाण्याखाली आहे. या पुराने ३२४ जणांचे बळी घेतले असून अडीच लाख नागरिक बेघर झालेत. त्यासोबतच, तब्बल ९ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या पूरपरिस्थिती हवाई पाहणी केली. त्यावेळी जे चित्र दिसलं त्यातून केरळमधील भीषण जलप्रलयाची सहज प्रचिती येते. पंतप्रधानांनी केरळला ५०० कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. तसंच, मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची आणि गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
केरळमध्ये १०० वर्षातील सर्वात भयानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. आठवडाभर कोसळणाऱ्या पावसाने राज्य पार कोलमडून गेलं असतानाच, 14 पैकी 13 जिल्ह्यांत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आयटीबीपीचे जवान पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत.
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य सर्वच राज्यांकडून मदत मागितली आहे. या आवाहनानंतर, स्टेट बँकेनं २ कोटी रुपयांची मदत दिली आहे. अन्य कंपन्या आणि संस्थाही केरळमधील पूरग्रस्तांसाठी खारीचा वाटा उचलण्यास पुढे सरसावल्या आहेत. यूएईनेही केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.