तिरुवनंतपुरम - केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. राज्यातील काँग्रेस पक्षाचे विधानसभा आणि विधानपरिषदेचे सर्वच आमदार आपला एक महिन्याचा पगार केरळला मदतीनिधी म्हणून देणार असल्याचे काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. तसेच शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही आपला एक महिन्याचा पगार केरळच्या मदतनिधीसाठी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला आहे. तसेच संसदेतील इतर सहकाऱ्यांनी आणि महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदार व नगरसेवकांनी आपला एक महिन्याचा पगार केरळसाठी द्यावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे
केरळमध्ये आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत. केरळमध्ये आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. तर राज्य सरकारने 11 जिल्ह्यांना एक दिवसाचा अतिदक्षतेचा इशारा दिला असून अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री पिनराई विजयन, केंद्रीय मंत्री के. जे. अल्फान्स यांचाशी झालेल्या बैठकीमध्ये मोदी यांनी केरळला दिली 500 कोटींची तातडीची मदत जाहीर केली. याआधी 100 कोटींची मदत देण्यात आली होती. याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा केली.
तेलंगाना सरकारने शुक्रवारी केरळमधील पूरग्रस्तांना 25 कोटींची मदत जाहीर केली आहे. यानंतर आज इतर राज्यांकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.
बैठकीमध्ये पंतप्रधानांकडे मुख्यमंत्र्यांनी 2 हजार कोटींची मागणी केली होती. मात्र, पंतप्रधानांनी 500 कोटींची मदत देण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री विजयन यांनी केरळमध्ये 19 हजार 512 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिल्याचे केरळ मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटरवर म्हटले आहे.
तर स्टेट बँकेनेही केरळवासियांना दिलासा दिला असून दोन कोटींची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. तसेच बँक आॅफ केरळच्या खातेदारांना सेवा शुल्क आणि इतर दंड माफ करण्यात येणार आहे. तसेच युएईचे राजे शेख खलिफा यांनी केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्कालीन समिती नेमण्याची सूचना केली आहे.
दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडून केरळमधील पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत जाहीर केली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केरळ मुख्यमंत्री मदत निधीला 10 कोटी देण्याचे जाहीर केले आहे.
तसेच आेडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीदेखील केरळला 5 कोटी रुपये आणि मदतीसाठी 245 अग्ऩिशामक दलाच्या जवानांना बोटींसह केरळला पाठविण्याचे जाहीर केले आहे.
केरळमध्ये पुरामुळे 2 ते 3 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. केरळमधील महापुराला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
भारतीय सैन्याकडून विशेष विमानाने अन्न आणि इतर गरजेच्या वस्तू तिरुअनंतपुरमला पोहोचल्या.
झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांच्याकडून केरळला 5 कोटींची मदत जाहीर
महाराष्ट्र सरकारकडून पूरग्रस्त केरळला तातडीने 20 कोटींची मदत
काँगेसचे खासदार एक महिन्याचे वेतन केरळ पूरग्रस्तांसाठी देणार; राहुल गांधी यांची घोषणा
गुजरात सरकारकडून केरळला 10 कोटींची मदत जाहीर
आपचे सर्व आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार; केजरीवाल यांची घोषणा
पंजाब सरकारकडून केरळसाठी पाणी, दूध आणि अन्नाच्या स्वरुपात पाच कोटी रुपयांची मदत रवाना
उत्तर प्रदेश सरकराकडून केरळसाठी 15 कोटींची मदत जाहीर
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून आपल्या सद्भावना केरळवासियांसोबत असल्याचे म्हटले आहे. केवळ शब्दांनी सांत्वन करणे पुरेसे नाही. केरळच्या बंधुभगिनींसाठी आम्ही प्रार्थना करतोय. महापुराशी लढणाऱ्या केरळवासियांना ताकद मिळो, अशा शब्दांत ममता यांनी दुख: व्यक्त केले आहे.
तर जेएनयु विद्यार्थी संघटनेने आज सकाळी गृहमंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकार जाणूनबुजुन केरळच्या पुरग्रस्तांना मदत करण्यास वेळ लावत असल्याचा आरोप केला आहे.