तिरुवनंतपूरम- केरळमधील पुरामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरामुळे राज्यात विविध सेवा बंद पडल्या असून आर्थिक नुकसानही फार झाले आहे. कोची विमानतळाचे 200 ते 250 कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.पुराचे पाणी धावपट्टीवर आल्यामुळे 15 ऑगस्टपासून हा विमानतळ बंद आहे. 26 ऑगस्टरोजी विमानतळ पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. कोची एअरपोर्ट केरळमधील सर्वात जास्त वाहतूक होणारा विमानतळ आहे. येथे आखाती देशांमधून मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय प्रवासी येतात. सध्या 250 लोक या विमानतळाची दुरुस्ती करण्याच्या कामासाठी प्रयत्न करत आहेत.अनेक दिवसांच्या प्रयत्नांनतर विमानतळावरील पाणी बाहेर काढण्यात यश आले आहे. आता धावपट्टीवरील 800 दिवे आणि 2600 मीटर लांब संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.कोची विमानतळ हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालवले जाणारे जगातील एकमेव विमानतळ होते. पुरामुळे सोलर पॅनल्सचेही नुकसान झाले आहे. या पुरामुळे 20 टक्के पॅनल्स खराब झाले आहेत. केवळ सोलर पॅनल्सच नव्हे तर वीज साठवण्याचे केंद्राचेही नुकसान झाले आहे. सोलर पॅनल्ससाठी 10 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. विमनतळाचा विमा उतरवला असल्यामुळे इन्शुरन्स कंपनीकडून 250 कोटी रुपये मिळणार आहेत.
Kerala Floods:पुरामुळे कोची विमानतळाचे 250 कोटी रुपयांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 3:01 PM