नवी दिल्ली- केरळमध्ये आलेल्या पुरामुळे संपूर्ण राज्यामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहेत. या स्थितीची पाहाणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीकेरळचा दौरा करणार असून पूरस्थिती व मदतकार्याचे ते निरीक्षण करणार आहेत.
आज शुक्रवारी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर ते केरळला जाणार असून कोची येथे ते एक रात्र राहाणार आहेत. त्यानंतर ते उद्या पूरस्थितीचे निरीक्षण करणार आहेत. अशी माहिती केंद्रीय मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी दिली.
यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हेलीकॉप्टरने पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. त्यांच्यासोबतकेरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनीही पूरग्रस्त भागाचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी केरळला 100 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा केली. जोरदार पावसानं आलेल्या पुरात आतापर्यंत 8 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. हवामान खात्यानं राज्यातील 14 पैकी 13 जिल्ह्यांत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच सेंट्रल वॉटर कमिशनही पुराचं पाणी तुंबणा-या भागावर नजर ठेवून आहे. केरळमधल्या या मुसळधार पावसानं आतापर्यंत 167 जणांचा बळी घेतला आहे. केरळमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहता एनडीआरएफच्या पाच टीम तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाल्या आहेत. सध्या एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसेच एनडीआरएफची आणखी जवान केरळमध्ये दाखल होणार आहेत.