धक्कादायक! स्लिम होणं बेतलं जीवावर; ऑनलाईन डाएटमुळे १८ वर्षीय मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 11:39 IST2025-03-10T11:38:11+5:302025-03-10T11:39:02+5:30
एका १८ वर्षांच्या मुलीचा डाएटिंगमुळे मृत्यू झाला. मुलीने तिचं वजन कमी करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मदतीने एक खास डाएट प्लॅन फॉलो केला होता.

फोटो - आजतक
केरळमधील कन्नूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १८ वर्षांच्या मुलीचा डाएटिंगमुळे मृत्यू झाला. मुलीने तिचं वजन कमी करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मदतीने एक खास डाएट प्लॅन फॉलो केला होता. याआधीही वजन वाढण्याच्या भीतीने तिने जेवणही सोडलं होतं.
कन्नूरमधील कुथुपरंबा येथील रहिवासी श्रीनंदाचा थालास्सेरी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ती व्हेंटिलेटर सपोर्टवर होती. याच दरम्यान, तिच्यावर कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्येही उपचार झाले. नातेवाईकांचं म्हणणं आहे की, वजन वाढण्याच्या भीतीने श्रीनंदा जेवायची नाही आणि खूप व्यायाम करायची. ती लिक्विड डाएट घेत होती.
श्रीनंदा मत्तानूर मट्टनूर पजहस्सिराजा एनएसएस कॉलेजची विद्यार्थिनी होती. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हे एनोरेक्सिया नर्वोसा (Anorexia Nervosa) असू शकतं. हा जेवणासंबंधित एक आजार आहे. कोविडनंतरच्या काळात ही प्रकरणं अधिक दिसून आली आहेत. खाण्यापिण्याबाबतच्या मूर्खपणामुळे अशी अनेक प्रकरणं यापूर्वी उघडकीस आली आहेत. अनेक वेळा चुकीचं डाएटिंग आणि बॉडी बनवण्यासाठी स्टिरॉइड्सचा वापर यामुळे अनेक लोकांचे जीव गेले आहेत.
गेल्या वर्षी एका १४ वर्षांच्या मुलाने सोशल मीडिया चॅलेंजमध्ये भाग घेताना मसालेदार चिप्स खाल्ले. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यात मोठ्या प्रमाणात मिरची मिसळली होती. मुलाच्या शवविच्छेदन अहवालातून अनेक मोठे खुलासे झाले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे चिप्समध्ये मोठ्या प्रमाणात मिरची होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलाला जन्मजात हृदयरोग होता, अशी माहिती समोर आली आहे. ही घटना जरी अमेरिकेतील असली तरी भारतातही अशा अनेक वेगवेगळ्या घटना पाहायला मिळत आहेत.