नवी दिल्ली - एखाद्या चित्रपटात अथवा कार्टूनमध्ये हिरो हा घोड्यावर स्वार होऊन दिमाखात आल्याचं नेहमीच पाहतो. मात्र प्रत्यक्ष जीवनात असं कोणीतरी करेल यावर विश्वास ठेवणं थोडं कठीणचं आहे. केरळमधील एक विद्यार्थिनी घोड्यावर स्वार होऊन परिक्षेला गेली आहे. सध्या या शालेय मुलीची चर्चा रंगली असून तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. क्रिष्णा असं या मुलीचं नाव असून दहावीच्या परिक्षेला जाताना तिने घोडेस्वारी केली आहे.
घोडेस्वारी करणाऱ्या या मुलीचे सर्वत्र कौतुक होत असून अनेकांनी तिला बाहुबली चित्रपटातील देवसेना म्हटलं आहे. 'महिंद्रा अॅण्ड महिंद्रा' उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही तिच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शाळेच्या परीक्षेसाठी घोडेस्वारी करत जाण्याचा पर्याय क्रिष्णानेच निवडला होता. क्रिष्णाचा हाच अंदाज आनंद महिंद्रा यांना देखील भावला आहे. 'या मुलीला कोण ओळखतं का? मला तिच्यासोबत फोटो काढायचा आहे. She’s my hero' असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे. तसेच भविष्याकडे पाहण्याचा एक आशावादी दृष्टीकोन या मुलीने दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
क्रिष्णा ही केरळच्या थ्रिसूरची रहिवासी आहे. क्रिष्णाच्या वडिलांनी तिला दोन घोडे भेट स्वरुपात दिले होते. प्रशिक्षकांपैकीच एकाने तिचा परिक्षेला जात असतानाचा घोडेस्वारीचा एक व्हिडीओ चित्रीत करत तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. क्रिष्णाचा हा अनोखा अंदाज सर्वाचंच लक्ष वेधून घेत आहे.
अवाजवी हॉर्नला कंटाळून 11 वर्षाच्या मुलीने लिहिलं उद्योगपती आनंद महिंद्रांना पत्रआनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. काही दिवसांपूर्वी आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरुन एक फोटो शेअर केला होता. यामध्ये आनंद्र महिंद्रा यांनी 11 वर्षाच्या एका मुलीने त्यांना लिहलेलं पत्र शेअर केलं होतं. मुंबईत राहणाऱ्या महिका मिश्रा या 11 वर्षाच्या मुलीने आनंद महिंद्रा यांना पत्र लिहून काही लोक गाडी चालवताना अवाजवी हॉर्न वाजवून लोकांना त्रास देत असतात असं नमूद केलं होतं. हे पत्र वाचून आनंद महिंद्रा यांनी तिचं कौतुक करत दिवसभरातील व्यस्त कामातून आल्यानंतर अशी काही पत्रे असतात ती वाचून तुमचा दिवसभराचा थकवा दूर होतो असं सांगितलं होतं.