केरळात डाव्या पक्षांना ‘सोने’ महागात पडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 06:31 AM2021-03-10T06:31:58+5:302021-03-10T06:32:05+5:30
ऐन प्रचारात मुद्दा तापला : कोरोना काळातील काम झाकोळण्याची भीती
पोपट पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरुवनंतपुरम : कोरोना काळात चांगले काम केल्याने केरळातील डाव्या पक्षाच्या नेतृत्त्वाखालील एलडीएफ सरकारची प्रतिमा देशभर उजळून निघाली खरी. मात्र, गतवर्षी केरळमध्ये झालेल्या सोने तस्करीचे भूत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डाव्या पक्षांच्या मानगुटीवर बसल्याने डाव्या पक्षांची पुरती कोंडी झाली आहे. खुद्द मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांची नावे सोने तस्करी प्रकरणात अडकल्याने विरोधकांनी डाव्यांविरोधात रान उठविले आहे. त्यामुळे केरळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी उकरून काढलेले ‘सोने’ डाव्यांना महागात पडते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळल्यानंतर तेथे मोठ्या संसर्गाची भीती व्यक्त झाली होती. मात्र, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मंत्रिमंडळाने कोरोनाकाळात सर्वाधिक चांगल्या उपाययोजना करीत कोरोनाला रोखण्यात यश मिळविले होते. विशेषत: आरोग्यमंत्री के. शैलजा यांच्या कामाची तर जगभर स्तुती झाली होती. ६० लाख नागरिकांना प्रत्येकी १६०० रुपये पेन्शन, ८० लाख कुटुंबांना धान्य कीट, तर कोरोना रुग्णावर मोफत उपचार यांसारख्या अनेक सुविधा देऊन केरळमधील एलडीएफ सरकारने आपली प्रतिमा उंचावली आहे. सोने तस्करीची ही घटना ५ जुलै २०२० रोजी घडली होती. त्यानंतर राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीने घवघवीत यश मिळवले होते. ५ पैकी ४ महानगरपालिका, तर १५० पैकी १०८ पंचायत समित्यांवर डाव्यांनी झेंडा फडकविला होता.
शबरीमाला नव्हे... सोन्यावर बोला
n शबरीमाला मंदिराच्या प्रवेशावरून केरळमध्ये डावे पक्ष आणि भाजपमध्ये सातत्याने वादाच्या ठिणग्या पडत असतात. लोकसभा निवडणुकीत तर भाजपने शबरीमाला मंदिराचा मुद्दा घेऊन राज्यभर डाव्यांविरोधात संघर्ष केला. यात हिंदूंच्या मतांमध्ये ध्रुवीकरण करण्यातही भाजप यशस्वी ठरला.
n विधानसभा निवडणुकीत मात्र, भाजपने शबरीमालापेक्षाही सोने तस्करीचा मुद्दा अधिक आक्रमकपणे उचलत डाव्यांना खिंडीत गाठले आहे. भाजपने मेट्रोमॅन ई श्रीधरन यांचा चेहरा पुढे केला आहे.