थिरुवनंतपूरम : हेरगिरीचा धादांत खोटा खटला २५ वर्षांपूर्वी दाखल करून भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) माजी वैज्ञानिक नम्बी नारायण यांची अब्रूनुकसानी केल्याबद्दल केरळ सरकारने त्यांना भरपाईपोटी १.३ कोटी रुपयांची रक्कम सुपूर्द केली आहे. अशी भरपाई देण्याचा निर्णय केरळच्या मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी घेतला होता. ही भरपाई पोलिसांच्या कुटिल कारस्थानामुळे द्यावी लागल्याने ही रक्कम पोलीस खात्यासाठी असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून देण्यात आली.केरळ सरकारमधील वरिष्ठ सूत्रांनुसार या रकमेचा धनादेश काही दिवसांपूर्वी नम्बी नारायण यांना सुपूर्द करण्यात आला. याआधी सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्या आदेशानुसार केरळ सरकारने नारायण यांना अनुक्रमे ५० लाख रुपये व १० लाख रुपयांची भरपाई देण्यात आली होती.या दोन्ही न्यायपीठांनी भरपाईचा आदेश देताना कायद्यानुसार अब्रुनुकसानीचा दावा दाखल करून भरपाई वसूल करण्याचा नाकायण यांचा हक्क अबाधित ठेवला होता. त्यानुसार नारायण यांनी थिरुवनंतपूरम येथील दिवाणी न्यायालयात दाखल केला. त्यात हा दावा तडजोडीने मिटविण्याची उभयपक्षी तडजोड झाली. या तडजोडीनुसार नारायण यांना किती भरपाई द्यावी हे ठरविण्यासाठी केरळ सरकारने मुख्य सचिवांची समिती नेमली. समितीने १.३० कोटी रुपये भरपाईची शिफारस केली. (वृत्तसंस्था)काय आहे नेमके प्रकरण?अमेरिकेने भारतावर निर्बंध घातल्यानंतर अंतराळ मोहिमांच्या अग्निबाणांसाठी वापरायच्या क्रायोजेनिक इंजिनचे तंत्रज्ञान ‘इस्रो’चे वैज्ञानिक विकसित करीत होते. त्यावेळी नारायण ‘इस्रो’मध्ये होते. त्याबाबतची गोपनीय माहिती रशिया व पाकिस्तानला चोरून पुरविल्याचा धादांत खोटा आरोप ठेवून सन १९९४ मध्ये नारायण व आणखी एका वैज्ञनिकावर हेरगिरीचा खटला दाखल केला होता.
माजी वैज्ञानिकास अब्रूनुकसानीबद्दल १.३० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 1:57 AM