कोल्लम: केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या विरोधात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या कार्यकर्त्यांनी शनिवारी कोल्लम जिल्ह्यातील निलमेल येथे निदर्शने केली. या घटनेनंतर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे आपल्या गाडीतून खाली उतरले आणि आंदोलकांना अटक करण्याच्या मागणीसाठी स्वत: रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानासमोर धरणे आंदोलन सुरु केले.
स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया च्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान संतप्त झाले. यानंतर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी एमसी रोडवरील एका चहाच्या दुकानातून खुर्ची घेऊन तिथे बसले आणि आंदोलकांवर कारवाईची मागणी केली. तसेच, टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित होत असलेल्या व्हिडीओमध्ये संतापलेले राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे पोलिसांशी कडक शब्दात बोलताना दिसत आहेत.
घटनास्थळी पोलिसांव्यतिरिक्त इतर अधिकारी आणि स्थानिक लोक मोठ्या संख्येने जमले होते. दरम्यान, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान एका कार्यक्रमासाठी कोट्टारक्करा येथे जात असताना राज्यातील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची (CPM) विद्यार्थी संघटना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचा रस्त्यात काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.
दरम्यान, राज्यातील विद्यापीठांचे कामकाज आणि विधानसभेने मंजूर केलेल्या काही विधेयकांवर राज्यपालांनी स्वाक्षरी न करणे यासह अनेक मुद्द्यांवरून राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि राज्यातील सत्ताधारी डाव्या आघाडीचे सरकार यांच्यात तणाव आहे. अशा स्थितीत राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी गुरुवारी विधानसभेतील आपले भाषण केवळ शेवटचा परिच्छेद वाचून संपवले आणि सरकारबद्दल नाराजी दर्शविली होती.