तिरुअनंतपुरम : कन्नूर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या इंडियन हिस्टरी काँग्रेसच्या (अखिल भारतीय इतिहास अधिवेशन) अधिवेशनात झालेल्या गोंधळाबाबत माहिती देताना राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मंचावर सुरक्षा रक्षक नसते तर इतिहासकार इरफान हबीब यांनी माझ्यावर हल्लाच केला असता असा आरोप केला आहे.
शनिवारी 80 व्या इंडियन हिस्टरी काँग्रेसचे अधिवेशन कन्नूर विद्यापीठात आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाचे उद्घाटन राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केले. यानंतर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनांवर भाष्य करीत असताना काही प्रतिनिधींनी त्यांना विरोध केला आणि गोंधळ घातला.
या घडलेल्या प्रकाराबद्दल राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी रविवारी भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, "मंचावर उपस्थित मल्याळी साहित्यिक शाहजहां मादमपर यांचे विचारही माझ्यापेक्षा वेगळे होते. ते मचांवर असणाऱ्या वरिष्ठ लोकांपैकी एक होते. मी त्यांना सांगितले की, जे लोक विरोध आणि घोषणाबाजी करत आहेत. त्यांना माझ्याकडे चर्चेसाठी पाठवा. त्यानंतर ते गेले आणि परत आल्यानंतर त्यांनी सांगितले की, आंदोलक चर्चा करण्यासाठी आले नाही, तर आंदोलन करण्यासाठी आले आहेत."
यावर मी म्हटले की, तुम्ही चर्चेचा मार्ग बंद केला तर हिंसा आणि द्वेषाचे वातावरण तयार होते. असे म्हटल्यानंतर इरफान हबीब मंचावरून उठले आणि माझ्याकडे आले. त्यांना एसडीसीने रोखले. त्यानंतर पुन्हा सोफ्याच्या पाठीमागून माझ्याकडे आले असता त्यांना सुरक्षा रक्षकांनी पुन्हा अडविले. अन्यथा त्यांनी माझ्यावर हल्ला केला असता. हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.