देशातील पहिला तृतीयपंथी वैमानिक विमान उडवणार, कधीकाळी कुटुंबीयांनी काढले होते घराबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 11:31 AM2019-10-13T11:31:27+5:302019-10-13T11:38:42+5:30
देशातील पहिल्या तृतीयपंथी वैमानिकाचं विमान उडवण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
तिरुवनंतपूरम - देशातील पहिल्या तृतीयपंथी वैमानिकाचं विमान उडवण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. एडम हॅरी असं या 20 वर्षीय तृतीयपंथी वैमानिकाचं नाव आहे. केरळ सरकारने 20 वर्षीय हॅरीला व्यावसायिक परवानाच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तृतीयपंथी असल्याने हॅरीला कुटुंबीयांनी घरातून बाहेर काढलं होतं.
विमान उडवण्याकरता त्याच्याकडे व्यावसायिक परवाना असणं गरजेचं आहे. कुटुंबीयांनी घरातून बाहेर काढल्यानंतर शिक्षणाची फी भरण्यासाठी देखील हॅरीकडे पैसे नव्हते. त्याची तीन वर्षांची ट्रेनिंग फी ही 23.3 लाख रुपये इतकी असणार आहे. केरळ सरकारने एडम हॅरीला 23 लाख रुपये मदतनिधी देण्याचा निर्णय घेतला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एडम हॅरी हा पहिला तृतीयपंथी वैमानिक असणार आहे ज्याला व्यावसायिक परवाना मिळणार आहे. हॅरीने राज्याच्या सामाजिक न्याय विभाग आणि त्यांचे सचिव बीजू प्रभाकर यांना आपला संघर्ष सांगितला होता. त्यांनी हॅरीचा संघर्ष ओळखून त्याला मदत केली आहे. हॅरी तिरूवंतपुरमच्या राजीव गांधी एविएशन टेक्नॉलॉजी अकॅडमीतून शिक्षण पूर्ण करणार आहे. केरळ सरकार ट्रेनिंगचा पूर्ण खर्च करणार आहे. 23 लाख रुपये मदतनिधी देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा सरकारने केली आहे.
कुटुंबीयांना मी तृतीयपंथी असल्याचं समजल्यावर त्यांनी मारहाण केली आणि घरामध्ये कोंडून ठेवलं. तसेच मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. त्यामुळेच मी घर सोडण्याचा निर्णय घेऊन एक नवीन सुरुवात करण्याचा विचार केल्याचं हॅरीने सांगितलं आहे. केरळ सरकारने केलेल्या आर्थिक मदतीसाठी हॅरीने सरकारचे मनापासून आभार मानले आहेत. तसेच या निर्णयामुळे खूप खूश झाल्याचं देखील सांगितलं आहे.
क्रिकेट इतिहासामध्ये एक मोठा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या संघाने घेतला आहे. आपल्या क्रिकेट संघामध्ये एका तृतीयपंथी व्यक्तीला स्थान देण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने याबाबत खास नियमही बनवला आहे. आतापर्यंत एकाही आंतरराष्ट्रीय संघात तृतीयपंथी व्यक्तीला स्थान देण्यात आले नव्हते. पण जर राज्य स्तरावर एखादी तृतीयपंथी व्यक्ती चांगली कामगिरी करत असेल, तर त्या व्यक्तीला राष्ट्रीय संघातही स्थान देण्यात यावे, अशी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाची भूमिका आहे. जर तृतीयपंथी व्यक्तीला राष्ट्रीय क्रिकेट संघातून खेळायचे असेल तर त्यांना टेस्टोस्टेरोन चाचणी द्यावी लागेल, असेही ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने सांगितले आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये या तृतीयपंथी खेळाडूला स्थान देण्यात येणार आहे. एरिका जेम्स असे या तृतीयपंथी खेळाडूचे नाव आहे.