ऑनलाइन लोकमत
तिरूअनंतपूरम, दि. 10- देशातील अनेक लहान मोठ्या गावात अजूनही पाणी टंचाईचा सामना तेथिल लोकांना करावा लागतो. हंडाभऱ पाणी मिळावं यासाठी अनेक मैलांची पायपीटही करावी लागते. पाणी टंचाईच्या या समस्येवर मात करण्यासाठी अनेक पाऊलं सरकारकडून उचलली जातात पण विशेष म्हणजे गावातील स्थानिक नागरीक पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. केरळमध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तेथिल महिलांनी पुढाकार घेतला आहे. पाण्याची चणचण बंद व्हावी यासाठी केरळ मधील महिलांनी गावात चक्क 190 विहीरी खणल्या असल्याची माहिती समोर येते आहे. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील गावात तब्बल ३०० महिलांनी एकत्र येऊन हातात कुदळ घेऊन विहीर खणायला सुरूवात केली. फक्त पुरूष मेहनतीची कामं करू शकतात ही मक्तेदारी मोडत महिलांनी मेहनतीचं काम करून सगळ्यांसमोर नवा आदर्श उभा केला आहे. महिलांच्या या कामगिरीचं तेथिल नागरीकांसह पंचायत समितीकडूनही कौतुक केलं जातं आहे. या गावात नेहमीच दुष्काळाची झळ तेथिल लोकांना सोसावी लागते. तसंच पाणी टंचाईचा सामनासुद्धा करावा लागतो.
पाणी मिळवण्यासाठी कितीतरी फूट खोल खड्ड्यात फक्त एका बांबूच्या साहाय्याने या महिलांना उतरावं लागलं होतं. अनेक अडचणींना सामोर जावं लागत असतानाही जिद्द न सोडता महिलांनी पाणी टंचाईवर मात केली. गावात पाणी नसल्याची ओरड न करता त्या महिलांनी कष्टाने पाणी मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्या प्रयत्नात त्यांना यश आलं.
आणखी वाचा
कर्जमाफीचा लाभ ३६ लाख शेतकऱ्यांना
सुरक्षेच्या कारणाने व्हीआयपींची खासगी हेलिकॉप्टर सेवा स्थगित
‘मातोश्री’ची दानपेटी गुरुदक्षिणेच्या प्रतीक्षेत!
या 300 महिलांच्या समूहात ३५ पासून ते ७० वर्षीय महिलांचा समावेश आहे. या समूहाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत हे काम केलं आहे. या गावात फक्त विहीर आणि तलाव हेच पाणी मिळविण्याचं साधन आहे. कोणत्याही प्रशिक्षण आणि मशीनरीशिवाय 10 ते 12 फूट खोल विहीरी खणण्याचं काम या महिलांनी केलं आहे.