तिरुअनंतपूरम - केरळ उच्च न्यायालयाने 'एस दुर्गा' चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हिरवा कंदिल दाखवला आहे. उच्च न्यायालयाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांना इफ्फीमध्ये 'एस दुर्गा'चा समावेश करुन या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती के.विनोद चंद्रन यांनी 'एस दुर्गा' च्या स्क्रीनिंगवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घेतलेले आक्षेप फेटाळून लावले. सनल कुमार शशीधरन यांनी एस दुर्गा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
इफ्फीमधून चित्रपट वगळण्याच्या निर्णयाविरोधात सनल कुमार शशीधरन यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्युरींनी चित्रपट निवडल्यानंतरही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आपला अधिकार वापरुन हा चित्रपट महोत्सवातून वगळला होता. मल्ल्याळम सिनेमा 'एस.दुर्गा'ला सुद्धा इफ्फीतून वगळण्यात आलं आहे. या सिनेमातून समाजामधील गडद वास्तव आकर्षकपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चित्रपटाचे नाव आक्षेपार्ह असून यामुळे धार्मिक भावना दुखावतात त्यामुळे एस दुर्गाला इफ्फीमधून वगळले असा युक्तीवाद माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने न्यायालयात केला. एस दुर्गा चित्रपटाचा प्रमाणित न केलेला भाग ज्युरीनी निवडला असेही मंत्रालयाकडून न्यायालयात सांगण्यात आले. चित्रपटाला सेन्सॉरकडून U/A प्रमाणपत्र मिळाल्याचे सांगत न्यायालयाने मंत्रालयाचा आक्षेप फेटाळून लावला.
चित्रपटात काहीही अश्लीलता नाहीय. मंत्रालयाने पोरकट आणि हेकेखोरपणाची भूमिका घेतली आहे. मंत्रालयाने चित्रपटाचा आशय आणि विषय समजून घेतलेला नाही असे दिग्दर्शकाने याचिकेत म्हटले होते. दरम्यान चित्रपटाचे नाव बदलून सेक्सी दुर्गावरुन एस दुर्गा करण्यात आले. सेन्सॉरकडून चित्रपटाला U/A प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे इफ्फीमधून चित्रपटाला वगळण्याला काहीही अर्थ नाही असे याचिकेत म्हटले होते.
रवि जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या सिनेमाला 48 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी) वगळण्यात आलं. तेरा ज्युरी मेबर्सनी एकुण 24 सिनेमांची इंडियन पॅनोरमा विभागासाठी निवड केली होती. पॅनारोम विभागात न्यूड सिनेमाचं स्क्रीनिंग होणार होतं. पण माहिती व प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या यादीतून या सिनेमाला वगळण्यात आलं. सिनेमाच्या नावावर आक्षेप घेत या सिनेमाला यादीतून वगळण्यात आले.