Kerala High Court: देशात विविध प्रकारच्या गोष्टी घडत असतात. अनेकदा न्यायालयांसमोरही चमत्कारिक याचिका दाखल होत असतात. असाच एक अनुभव केरळउच्च न्यायालयाला आला आहे. मुलीचे नाव ठेवण्यावरून आई आणि वडिलांमध्ये एकमत होत नव्हते. मतभेदाचे रुपांतर भांडणात झाले. यामुळे तब्बल ३ वर्ष चिमुकलीचे नामकरण करण्यात आले नाही. हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर अखेर उच्च न्यायालयाने या मुलीचे बारसे केले.
केरळमधील कोच्चीमधील हे प्रकरण आहे. तीन वर्षांच्या मुलीच्या नावावरून पालकांमध्ये वाद सुरू आहे. उच्च न्यायालयात प्रकरण पोहोचल्यानंतर ३० सप्टेंबर रोजी न्यायालयाने याबाबत निर्णय दिला. बाळाचे नाव ठेवण्यास उशीर झाल्याने त्याच्या भविष्यावर परिणाम होत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या ती मागे पडत चालली आहे. पालकांमधील भांडणापेक्षा मुलांचे कल्याण अधिक महत्त्वाचे आहे, अशी अतिशय महत्त्वाची टिपण्णी उच्च न्यायालयाने यावेळी केली.
मुलीला शाळेत घालताना नावाचा प्रश्न समोर आला
मुलीचे आई-वडील वेगळे राहतात. आईने शाळा प्रवेशाची तयारी सुरू केली. शाळेने मुलीचा जन्म दाखला मागितला. पण त्यावर नाव नव्हते. अशा परिस्थितीत नावाशिवाय जन्म दाखला स्वीकारण्यास शाळेने नकार दिला. यानंतर आईने रजिस्ट्रारचे कार्यालय गाठले. जन्म प्रमाणपत्रात नाव नोंदवण्यासाठी अर्ज केला. आईने मुलीचे नाव 'पुण्य नायर' असे सांगितले. रजिस्ट्रार कार्यालयात, नोंदणी करताना दोन्ही पालकांची उपस्थिती आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. यानंतर वडिलांनी मुलीचे नाव 'पद्मा नायर' ठेवावे, असे सांगितले. मात्र, दोघांमध्ये नावावरून सहमती होऊ शकली नाही.
अखेर उच्च न्यायालयाने केले बारसे!
हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सांगितले की, मुलगी आईसोबत राहते, अशा परिस्थितीत तिने दिलेल्या नावाला महत्त्व दिले पाहिजे. पण हा समाज पितृसत्ताक आहे, त्यामुळे वडिलांचे नावही असायला हवे. मुलीचे नाव 'पुण्य' ठेवण्यात येईल. मात्र आडनाव म्हणून वडिलांचे नाव लावावे, असा आदेश न्यायालयाने दिला.