केरळमधील अलपुझा जिल्ह्यातील कायमकुल गावांतील मुस्लिम बांधवांनी मशिदीत एका हिंदू जोडप्याचा विवाह लावून देत अवघ्या जगाला सांप्रदायिक, सामाजिक सलोख्याचे अद्वितीय उदहारण घालून देत एकतेचा संदेश दिला.हा अभूतपूर्व विवाह समारंभ गावातील जुन्या चेरावल्ली जमात मशिदीत हिंदू धर्माच्या रितीरिवाजानुसार मोठ्या आनंदात पार पडला.वधु अंजूचे वडिल अशोक कुमार (४९) यांचे अचानक निधन झाले. मुलीचे लग्न कसं करायचं? याची चिंता अंजुच्या आईला लागली होती. त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची होती. अंजुचे वडील अशोक कुमार आणि जमातचे सचिव नजमुद्दीन यांची मैत्री होती. अंजुच्या आईने नजमुद्दीन यांना मदतीसाठी विनंती केली. त्यांनीही कुठलीही सबब पुढे न करता तयारी दाखविली आणि मशिद समितीपुढे अंजुचे लग्न लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला. समितीनेही सामाजिक बांधिलकी आणि मानवतेच्या दृष्टीने संमती दिली आणि अंजुचा विवाह समारंभ मशिदीत हिंदू धर्माच्या रितीरिवाजानुसार पूजा, हवन आदी मंगलविधिसह पार पडला.शरत शशि आणि अंजु या नवदाम्पत्यांना शुभार्शीवाद देण्यासाठी आलेल्या ४ हजार पाहुण्यांना शाकाहारी भोजनाची पंगतही देण्यात आली. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर वधु-वराने मशिदीचे इमाम रियासुद्दीन फैजी यांचे आशीर्वाद घेतले. चेरावल्ली मुस्लिम जमात कमिटीने वधु-वराला सोन्याची दहा नाणे, दोन लाख रुपये रोख, तसेच टीव्ही, फ्रीज आणि फर्निचरसह संसारोपयोगी वस्तू भेट म्हणूनदिल्या.असे विवाह किंवा समारंभ मंदीर, चर्च, गुरुद्वारात का होऊ शकत नाहीत? ही सर्व धार्मिक ठिकाणे सर्वांसाठी खुले का होत नाहीत? एक-दुसऱ्याच्या रितीरिवांजांचा आदर का करीत नाही? दुर्दैवाने धर्माच्या नावावर शतकांपासून संकुचित राजकारण केले जात आहे. धर्माच्या नावाने काही लोक समाजात तेढ निर्माण करीत आहेत. आपसांत लढवून एक-दुसºयाला कमी लेखतात, असे चित्र असतांना मशिदीत हिंदु जोडप्याचा विवाह लावून मल्याळी मुस्लिम समुदायाने आम्ही भारतीय असल्याचे दाखवून दिले.- डॉ. वेदप्रताप वैदिकया अद्वितीय विवाह सोहळ्यातून मल्याळी मुस्लिम समाज किती महान, मोठ्या मनाचा आणि किती मानवतावादी आहे, हे सिद्ध केले. सोबतच मानवता आणि एकतेचा संदेशही दिला.