नवी दिल्ली : केरळमध्ये यंदा ४ जून रोजी म्हणजे नेहमीपेक्षा तीन दिवस विलंबाने मान्सून धडकणार असल्याचा अंदाज हवामानाची माहिती देणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या ९२ टक्के पावसाची शक्यता असल्याचेही स्कायमेटने म्हटले आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन नेहमी १ जून रोजी होते. भारतीय हवामान विभागाचे अंदाज मात्र अद्याप जाहीर झालेले नाहीत. अनेकदा स्कायमेट व हवामान विभाग यांच्या अंदाजात फरक दिसून आला आहे.
महाराष्ट्रापुरते सांगायचे झाल्यास राज्यात पावसाला विलंबानेच सुरुवात होईल. १० जून नंतर मान्सून मुंबईत दाखल होणार असला तरी जूनमध्ये महाराष्ट्रात फारसा पाऊस होण्याची शक्यता कमी असून, जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यातच मान्सून राज्यात सक्रिय होईल, असे स्कायमेटचे म्हणणे आहे. देशाप्रमाणे राज्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचे स्कायमेटच्या अंदाजावरून स्पष्ट होते.
विदर्भ व मराठवाड्यात गेल्या वर्षीइतकाच पावसाचा अंदाज या संस्थेने वर्तविला आहे. गेल्या वर्षी स्कायमेटने सरासरीच्या ९७ टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली होती. परंतु प्रत्यक्षात ९१ टक्के इतकाच पाऊ स गेल्या वर्षी झाला. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. यंदा ९३ टक्के पावसाची शक्यता व्यक्त करताना स्कायमेटने त्यात ५ टक्के इतका कमी वा अधिक फरक होऊ शकतो, असे म्हटले आहे.
अंदाजाबाबत स्कायमेटचे सीईओ जतीन सिंह यांनी येथे सांगितले की, या वर्षी देशाच्या चारही प्रमुख विभागांत सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. मान्सूनचे आगमन अंदमान-निकोबार द्वीपसमूहात २२ मे रोजी होण्याची शक्यता आहे. पूर्व तसेच ईशान्य भारतात ९२ टक्क्यांपर्यंत पावसाची शक्यता आहे. हे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे. ईशान्येकडील सातही राज्ये तसेच बिहार, झारखंड, पश्चिम बंगालला याचा फटका बसू शकतो. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये चांगला पाऊ स अपेक्षित असला तरी हरयाणा, पंजाब, राजस्थान व दिल्लीमध्ये त्याचे प्रमाण कमी असेल.विदर्भ, मराठवाड्याला फटका बसण्याची शक्यताविदर्भ, मराठवाडा, गुजरात व मध्य प्रदेशच्या पश्चिमी भागांत ९१ टक्के म्हणजे बºयाच कमी पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. केरळ व कर्नाटकची किनारपट्टी वगळता दक्षिणेकडील राज्यांमध्येही फार चांगल्या पावसाची शक्यता नसल्याचे स्कायमेटच्या अंदाजातून दिसत आहे.