केरळ नरबळीप्रकरण: तेथे २ नव्हे, अनेक महिलांचा बळी? ५ वर्षांत २६ जणी झाल्या बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 05:39 AM2022-10-16T05:39:39+5:302022-10-16T05:40:22+5:30
केरळच्या पथनमिट्टा जिल्ह्यातील २ महिलांच्या बळीच्या घटनेच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे.
तिरुवनंतपुरम: केरळच्या पथनमिट्टा जिल्ह्यातील २ महिलांच्या बळीच्या घटनेच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत असून, आरोपींनी केवळ २ नव्हे, तर अनेक नरबळी दिले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यातील सत्य बाहेर आणण्यासाठी एका आरोपीची जमीन खोदण्याचा निर्णय तपास करणाऱ्या विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) घेतला आहे.
सप्टेंबरमध्ये बेपत्ता झालेल्या २ महिलांचा बळी देण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी मोहंमद शफी, भगवलसिंह आणि त्याची पत्नी लैला या आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी पथनमिथिट्टा येथून बेपत्ता झालेल्या पद्मा आणि रोसलिन यांचा बळी देऊन त्यांच्यासोबत बीभत्स कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणाची चौकशी आता एसआयटीकडे सोपविण्यात आली आहे. मोहंमद शफी ऊर्फ राशिद हा संपूर्ण केरळात फिरून आपली शिकार हेरत होता, असा तपास पथकास संशय आहे. त्याच्या जमिनीत आणखी काही मृतदेह गाडलेले असू शकतात. त्यामुळे त्याच्या जमिनीचे खोदकाम करण्याचा निर्णय तपास पथकाने घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार, मागील ५ वर्षांत पथनमिथिट्टा येथून १२ आणि एर्नाकुलम येथून १४ महिला बेपत्ता झालेल्या आहेत. या सर्व २६ महिलांचा बळी दिला गेला असावा, असा पाेलिसांना दाट संशय आहे. (वृत्तसंस्था)
पद्माचे दागिने गहाण ठेवून पत्नीला दिले पैसे
आरोपी शफी याने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या पत्नीला ४० हजार रुपये दिले होते. हे पैसे त्याने बळी दिलेल्या पद्मा या महिलेचे दागिने गहाण ठेवून आणले होते, असे तपासात आढळून आले आहे. सोने गहाण ठेवणाऱ्या एर्नाकुलम येथील एका दलालास पोलिसांनी अटक केली आहे.
मानवाधिकार आयोगाची नोटीस
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) केरळचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना एक नोटीस बजावली असून या प्रकरणाचा अहवाल ४ आठवड्यात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"