तिरुवनंतपूरम : नातेवाइकाच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या वादात केरळचे उद्योगमंत्री ई. पी. जयराजन यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा दिला. राज्यात पाच महिन्यांपूर्वी माकपच्या (मार्क्सवादी) नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या डाव्या लोकशाही आघाडी सरकारला हा मोठा धक्का बसला. केरळ सरकारी मालकीच्या उद्योगात आपल्या जवळच्या नातेवाईकाची नियुक्ती केल्याची ‘चूक’ जयराजन यांनी या बैठकीत मान्य केली. जयराजन हे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या विश्वासातील समजले जातात. केरळ इंडस्ट्रीयल एंटरप्रायजेस लिमिटेडमध्ये जयराजन यांनी कन्नूरच्या खासदार पी. के. श्रीमती यांचा मुलगा व आपला भाचा पी. के. सुधीर यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली होती. ही नियुक्ती नंतर सरकारने रद्द केली. जयराजन यांच्या भावाची सून दीप्ती निशाद यांची नियुक्तीही अशीच वादग्रस्त ठरली होती. निशाद यांनीही दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला.जयराजन यांनी आपल्या नातेवाईकांच्या केलेल्या व वादग्रस्त ठरलेल्या नियुक्त्यांची प्राथमिक चौकशी दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (व्हीएसीबी) सुरू केली आहे. (वृत्तसंस्था)
केरळचे उद्योगमंत्री जयराजन यांचा राजीनामा, चौकशी सुरू
By admin | Published: October 15, 2016 1:52 AM