कन्नूर- केरळमधल्या कन्नूरमध्ये वास्तव्याला असलेल्या पेरुन्नन राजन हे मजुरीचं काम करतात. 10 फेब्रुवारीला त्यांच्या आयुष्यात असं काही घडलं की त्यांचं जीवनच बदलून गेलं. मजुरी करणाऱ्या राजन यांना लाखोंची नव्हे, तर 12 कोटींची लॉटरी लागली. टॅक्स कापून त्यांच्या खात्यात जवळपास 7 कोटी रुपये आले आहेत. मी रातोरात करोडपती झालो हे स्वप्नच वाटत असल्याचंही भावनाही राजन यांनी व्यक्त केली. मलूरच्या थोलांबरा भागात राहणाऱ्या 58 वर्षीय राजन मजुरीचं काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. परिस्थिती बेताची असली तरी ते लॉटरीचं तिकीट घेण्यास विसरत नाहीत. त्यांना विश्वास होता की, कधी तरी त्यांचं नशीब फळफळेल. बऱ्याचदा क्रॉस चेक केला निकाललॉटरी लागल्यानंतर राजन म्हणाले, मला एवढे मोठे यश मिळेल असं वाटलं नव्हतं. जेव्हा लॉटरीचे निकाल जाहीर करण्यात आले, तेव्हा मी जिंकेन असं वाटलं नव्हतं. कुटुंबीयांबरोबर लॉटरीचा निकाल पाहिला आणि माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. लॉटरीचं तिकीट बँकेत जमा करण्यापूर्वी अनेकदा ते क्रॉस-चेक केल्याचंही राजन यांनी सांगितलं. गरजवंतांसाठी काही तरी करणारथोलांबराच्या को-ऑपरेटिव्ह बँकेशी संपर्क साधला आहे. तिथल्या अधिकाऱ्यांनी कन्नूरच्या जिल्हा बँकेत जाण्यास सांगितलं, असंही राजन सांगतात. त्यानंतर ते पत्नी रजनी, मुलगा रिगील आणि मुलगी अक्षराबरोबर बँकेत पोहोचले आणि तिथे तिकीट सबमिट केलं. लॉटरीचे पैसे काय करणार यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, सर्वात आधी घेतलेल्या उधाऱ्या फेडून टाकणार आहे. त्यानंतर ते गरजवंतांसाठी काही तरी करणार आहेत. मला कष्टाच्या कमाईची किंमत माहीत आहे. अशातच ही रक्कम वाया जाऊ देणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
मजुराला 12 कोटींची लागली लॉटरी अन् झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 12:51 PM