माझा मुलगा निवडणुकीत पराभूत झाला पाहिजे, काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने मुलाविरोधात थोपटले दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 16:39 IST2024-04-09T16:39:30+5:302024-04-09T16:39:58+5:30
Kerala Lok Sabha Election 2024: भारतीय राजकारणातील घराणेशाही ही सर्वश्रुत आहे. अनेक बडे नेते आपल्या पश्चात आपल्या पुढच्या पिढीला राजकारणामध्ये स्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र केरळमध्ये सध्या वेगळंच चित्र दिसत आहे.

माझा मुलगा निवडणुकीत पराभूत झाला पाहिजे, काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने मुलाविरोधात थोपटले दंड
भारतीय राजकारणातील घराणेशाही ही सर्वश्रुत आहे. अनेक बडे नेते आपल्या पश्चात आपल्या पुढच्या पिढीला राजकारणामध्ये स्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र केरळमध्ये सध्या वेगळंच चित्र दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ए.के. अँटोनी यांनी पुत्र अनिल अँटोनीविरोधात दंड थोपटले आहेत. माझा मुलगा अनिल अँटोनी याचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला पाहिजे, असं विधान ए.के. अँटोनी यांनी केलं आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपाचा आलेख सातत्याने घसरत असून, इंडिया ब्लॉक सातत्याने उभारी घेत आहे, असा दावाही त्यांनी केला.
ए.के. अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांनी काही काळापूर्वी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, भाजपाने त्यांना केरळमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. अनिल अँटोनी यांचा सामना काँग्रेसच्या एंटो अँटोनी यांच्याशी होणार आहे. दरम्यान, अनिल अँटोनी यांच्या उमेदवारीबाबत भाष्य करताना ए.के.अँटोनी म्हणाले की, भाजपा उमेदवार असलेल्या माझ्या मुलाचा पराभव झाला पाहिजे आणि काँग्रेसचे उमेदवार एंटो अँटोनी यांचा विजय झाला पाहिजे.
यावेळी अनिल अँटोनी यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय हा चुकीचा असल्याचे मतही ए. के. अँटोनी यांनी मांडले. काँग्रेस हा माझा धर्म आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलांनी भाजपासोबत जाणं हे चुकीचं आहे. जोपर्यंत माझा प्रश्न आहे तर मी राजकारणात आल्यापासून माझ्यासाठी कुटुंब वेगळं आहे आणि राजकारणं वेगळं आहे, असेही अँटोनी यांनी सांगितले.