अरेरे! 25 कोटींची लॉटरी लागताच आनंदाने नाचला अन् आता प्रचंड वैतागला; जाणून घ्या, नेमकं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 10:24 AM2022-11-10T10:24:01+5:302022-11-10T10:24:55+5:30
रातोरात कोट्याधीश झालेला, तब्बल 25 कोटींची लॉटरी जिंकलेला व्यक्ती दु:खी झाला आहे.
लॉटरी लागल्यावर सर्वच जण खूप खूश होतात. त्यांचा आनंद गगनात मावत नाही. पण या अगदी उलट एक घटना आता समोर आली आहे. रातोरात कोट्याधीश झालेला, तब्बल 25 कोटींची लॉटरी जिंकलेला व्यक्ती दु:खी झाला आहे. केरळचे अनूप. बी य़ांनी दोन महिन्यांपूर्वी एक सरकारी लॉटरी जिंकली होती. लॉटरी जिंकल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे अनूप सध्या खूप त्रासल्याची माहिती मिळत आहेत.
लॉटरी लागल्यानंतर अनूप यांच्या आयुष्यात असे काही बदल झाले की त्यांनी कधी याचा विचारही केला नव्हता. घरातून बाहेर पडल्यानंतर लोकांचं लक्ष फक्त त्यांच्याकडेच असतं. अनेक मित्र आणि नातेवाईक नाराज आहेत, असं अनूप यांनी सांगितलं. दिवसभरात अनूप यांना अनेक जण भेटतात. त्यातील खूप लोक पैशांची मागणी करतात. अनूप यांनी सप्टेंबर 2022 मध्ये लॉटरी जिंकली. देशातील सर्वात मोठी सरकारी लॉटरी जिंकल्याने नशीब फळफळलं.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, तिरुवनंतपूरम येथे राहणाऱ्या अनूप हे गेल्या कित्येक वर्षांपासून लॉटरीचं तिकीट खरेदी करत होते. याआधी त्यांनी लहानसहान रकमेची लॉटरी जिंकली आहे. अनूप 25 कोटी रुपयांची लॉटरी जिंकले. तेव्हापासून अनुप यांचं आयुष्य बदललं. लॉटरी जिंकल्यानंतर लोकांचा दृष्टीकोन बदलला. त्यांचं वागणं बदललं. लॉटरी लागल्यावर शेकडो लोक भेटायला आले. सकाळी झोपेतून उठून घराबाहेर पडायचो, तर मोठी रांग लागलेली असायची.
पहाटे पाचपासून लोक भेटायला यायचे. त्यांना आर्थिक मदत हवी असायची, असं अनूप यांनी सांगितलं. लॉटरी जिंकल्यानंतर अनूप यांच्याशी अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला. त्यांची मुलाखत घेतली. जिंकलेल्या पैशातून लोकांची मदत करण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं. त्यानंतर अनूप यांच्या घराजवळ गर्दी झाली. एक व्यक्ती तर रॉयल एनफिल्ड घेऊन द्या अशी मागणी करत दिवसभर घरात ठाण मांडून होता, अशी माहिती अनूप यांनी दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"