कोडेनचेरी: केरळमध्ये एका व्यक्तीनं दाखवलेल्या साहसामुळे मोठा अनर्थ टळला आहे. एका व्यक्तीच्या प्रसंगावधनामुळे शेकडो व्यक्तींचा जीव वाचला. भुसा घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला आग लागताच चालकानं पळ काढला. भरवस्तीत ट्रक जत असल्यानं मोठ्या दुर्घटनेचा धोका होता. मात्र तितक्यात एका व्यक्तीनं ट्रकचं स्टेअरिंग हाती घेतलं. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यानं ट्रक पळवण्यास सुरुवात केली. गर्दीच्या ठिकाणांपासून त्यानं ट्रक दूर नेला. एका रिकाम्या मैदानात उभा केला आणि पुढचा अनर्थ टळला.
केरळच्या कोडेनचेरी शहरात रविवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास तांदळाचा भुसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली. रस्त्याच्या वरून जाणाऱ्या हायटेंशन पॉवर लाईनला ट्रकचा स्पर्श झाल्यानं त्यातल्या भुशानं पेट घेतला. आग वाढत असलेली पाहून चालकानं पळ काढला. आगीची तीव्रता पाहता डिझेल टँकचा स्फोट होऊन मोठा स्फोट होण्याची भीती होती. तसं झालं असतं तर आसपास असलेल्या अनेकांचा जीव गेला असता.
ट्रक चालकानं पळ काढलेला असताना तिथे असलेल्या ४५ वर्षीय शाहजी वर्गीस यांनी प्रसंगावधान राखलं. ते लगेच ट्रकमध्ये चढले. त्यांनी तत्काळ स्टेअरिंगचा ताबा घेतला. वर्गीस यांनी ट्रक वेगानं चालवण्यास सुरुवात केली. वर्दळीच्या भागातून त्यांनी ट्रक मोकळ्या जागेत आणला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
शाहजी पप्पन नावानं प्रसिद्ध असलेल्या वर्गीस यांनी धाडस दाखवल्यानं अनेकांचा जीव वाचला. ट्रकचा ताबा घेताच वर्गीस यांनी तो झिगझॅग पद्धतीनं चालवला. त्यामुळे जळत असलेला भुसा रस्त्यावर पडत गेला आणि ट्रकला लागलेली आग काहीशी नियंत्रणात आली. बाकीची आग वर्गीस यांनी मोकळ्या मैदानात स्थानिकांच्या मदतीनं विझवली. विशेष म्हणजे अग्निशमन दलाचे जवान येण्यापूर्वीच वर्गीस यांनी आग विझवली होती. वर्गीस यांना २५ वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव आहे. त्यांनी मोठे ट्रक, बसेस चालवल्या आहेत.