कोझिकोड : केरळच्या कोझिकोडमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इलाथूरजवळ अज्ञात व्यक्तीने धावत्या ट्रेनमध्ये एका महिला प्रवाशावर पेट्रोल शिंपडून आग लावली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अलप्पुझा-कन्नूर मेन एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसच्या D1 डब्यात रात्री 10 वाजता घडली. या घटनेत आठ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
जखमी झालेल्या पाच जणांना कोझिकोड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, इतर तीन जखमी लोकांना कोझिकोडच्या बेबी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, ही घटना इलाथूर पुलावर ट्रेन असताना घडली. अलप्पुझाहून कन्नूरला जाणारी एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेस कोझिकोड सेंट्रल स्टेशनवरून निघाली होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसच्या D1 डब्यात ही हृदयद्रावक घटना घडली.
आरोपीने ट्रेनमधून उडी मारून केले पलायनकाही वादानंतर आरोपीने महिलेवर पेट्रोल शिंपडल्याचे ट्रेनमधील प्रवाशांनी सांगितले. ट्रेनमध्ये असलेल्या लोकांनी महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आठ जण जखमी झाले तर बाकीचे इतर डब्यात पळून गेले. तर आरोपीने ट्रेनमधून उडी मारून पलायन केले. आरपीएफ आणि कोझिकोड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.