Vande Bharat Express Train: भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्स्प्रेसची लोकप्रियता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत जात असल्याचे दिसत आहे. आताच्या घडीला देशात ३४ मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस चालवल्या जात असून, दिवाळीच्या दरम्यान आणखी ९ मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक सांभाळताना त्याच मार्गांवरील अन्य सेवांवर त्याचा परिणाम होत असून, ट्रेन लेट होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत एका खासदाराने थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये व्यथा मांडत तत्काळ दखल घेण्याचे आवाहन केले आहे.
वंदे भारतचे वेळापत्रक बदलण्याची मागणी अनेक भागातून केली जात आहे. राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिल्याचे वृत्त आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे इतर ट्रेनच्या वेळेवर परिणाम होत आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.
वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक बदलावे
रेल्वे मंत्रालयाने हस्तक्षेप करून वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी या खासदारांनी केली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी उत्तर केरळमधील सेमी हायस्पीड ट्रेनमध्ये अनारक्षित डब्यांची संख्या वाढवण्यात यावी, अशीही मागणी केली आहे. केरळमध्ये वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू करणे ही खरोखरच कौतुकाची बाब आहे, परंतु इतर रेल्वे सेवांच्या वेळेवर आणि विश्वासार्हतेवर होणाऱ्या परिणामांकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. तसेच ट्रेन सेवांच्या हॉल्टचा मुद्दा उपस्थित करत, दररोज प्रवास करणार्या आणि प्रवासासाठी सामान्य सेवांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांच्या जीवनमानावर परिणाम होतो, असे खासदारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, असे दिसते की, अन्य ट्रेनचे अनियोजित हॉल्ट वंदे भारत ट्रेनचा वेग आणि वेळ साधण्यासाठी केले जात आहेत. यामुळे इतर रेल्वे सेवांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. उत्तर केरळमध्ये धावणाऱ्या ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे, त्यामुळे गैरसोयीची आणि असुरक्षित परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणी रेल्वे मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करून आणखी अनारक्षित डबे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली आहे. वंदे भारत ट्रेनच्या वेळा बदलाव्यात कराव्यात, जेणेकरून इतर सेवांवर परिणाम होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.