Coronavirus Update: केरळमधून तिसऱ्या लाटेची सुरुवात झालीय का? तज्ज्ञांनी वाढत्या रुग्णसंख्येवर व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 07:57 PM2021-08-03T19:57:07+5:302021-08-03T19:58:02+5:30
Coronavirus Updates: केरळमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. केरळमधील रुग्णवाढ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरूवात ठरू शकते
Coronavirus Updates: केरळमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. केरळमधील रुग्णवाढ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरूवात ठरू शकते अशी चिंता वैज्ञानिक आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अर्थात राज्य सरकारनं अद्याप यास अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तज्ज्ञांच्या मतानुसार केरळमध्ये दुसऱ्या लाटेनं उच्चांक गाठल्यानंतर दर दिवशी सरासरी १२ ते १४ हजार नवे रुग्ण आढळत होते. पण आता पुन्हा एकदा ही संख्या २२ हजारांवर गेली आहे. (Kerala needs to be ready for third wave of corona, many waves can be seen in Kerala experts said)
केरळमध्ये गेल्या सहा दिवसांमध्ये दर दिवशी २२ हजार रुग्ण वाढ नोंदविण्यात आली आहे. यात संक्रमण दर १२ टक्क्यांपेक्षा अधिक दिसून आला आहे. हीच तिसऱ्या लाटेची सुरुवात ठरू शकते अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता सतर्क राहण्याची गरज असून आपल्याकडे लोकसंख्येची घनता अधिक आहे आणि सरकारला आता कोविड विरोधात लढण्यासाठी दिर्घकालीन रणनिती आखण्याची गरज आहे, असंही तज्ज्ञांनी नमूद केलं आहे. एकट्या केरळमध्ये देशातील एकूण रुग्णांपैकी ५१ टक्के रुग्ण आहेत.
"जेव्हा देशात लोकसंख्येची घनता अधिक असते तेव्हा तुमच्याकडे एखाद्या संसर्गजन्य रोगाच्या अनेक लाटा येऊ शकतात. रुग्णसंख्या कमी झाली तरी गाफील राहून चालणार नाही. केरळमध्येही येत्या काळात अनेक लाटा निर्माण होऊ शकतात. स्पॅनिश फ्लूवेळी चार लाटांनंतर देशातील रुग्णसंख्येत घट होऊ लागली होती. पण कोविडमध्ये असंच होईल असंही नाही. अनेक लाटांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं", असं केरळच्या माजी संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ.ए.सुकुमारन यांनी सांगितलं.