तिरुवनंतपुरम : दक्षिण भारतातील केरळ (Kerala) राज्यात पुन्हा एकदा निपाह व्हायरसमुळे (Nipah Virus) खळबळ माजली आहे. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, केरळच्या आरोग्य विभागानेही दोन जणांचा मृत्यू 'अनैसर्गिक' (Unnatural Deaths) मानला असून सोमवारी निपाह व्हायरसशी संबंधित अलर्ट जारी करण्यास विलंब केला नाही.
राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज (Health Minister Veena George) यांनीही उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या आरोग्य विभागाने सोमवारी रात्री एक अधिकृत निवेदनही जारी केले आहे. यामध्ये राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याचे सांगण्यात आले. तसेच, निवेदनात म्हटले आहे की, ताप आल्यानंतर दोन लोकांचा 'अनैसर्गिक' मृत्यू झाल्याची सूचना एका खाजगी रुग्णालयातून मिळाली आहे आणि त्यांच्या मृत्यूचे कारण निपाह व्हायरस असल्याचा संशय आहे.
याचबरोबर, मृतांपैकी एकाच्या नातेवाईकांनाही आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, २०१८ आणि २०२१ मध्ये कोझिकोड जिल्ह्यातही निपाह व्हायरसमुळे मृत्यूची नोंद झाली होती. दक्षिण भारतात निपाह व्हायरसचा पहिला रुग्ण १९ मे २०१८ रोजी कोझिकोड जिल्ह्यात आढळून आला होता.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, निपाह व्हायरसचा संसर्ग हा प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारा एक झुनोटिक रोग आहे आणि तो दूषित अन्नाद्वारे किंवा थेट एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. बाधित लोकांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. यामुळे अनेक आजार होतात. तीव्र श्वसन संबंधी आजार आणि धोकादायक एन्सेफलायटीससह अनेक आजार होऊ शकतात. याशिवाय, हा व्हायरस डुकरांसारख्या प्राण्यांमध्ये गंभीर आजाराचे कारण होऊ शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हटले आहे.