नवी दिल्ली : केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसचा 'बांगलादेश व्हेरिएंट' वेगाने पसरत आहे. बुधवारी या व्हायरसचा पाचवा रुग्ण आढळून आला, त्यानंतर कोझिकोड जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था पुढील दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, ताज्या माहितीनुसार, येथील एका आरोग्य कर्मचाऱ्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आज भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) संक्रमित लोकांच्या उपचारासाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीज उपलब्ध करून दिल्या जातील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
निपाह व्हायरसने पहिल्यांदा बाधित झालेल्या नऊ वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. 'द हिंदू' वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, त्याच्या संपर्कात आलेल्या ६० जणांचा शोध घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर कोझिकोडमधील मारुथोंकारा येथील ४७ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील ३७१ संपर्क वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, "मुलगा कोझिकोड येथील रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आम्ही आयसीएमआरकडे मोनोक्लोनल अँटीबॉडीजची ऑर्डर दिली आहे आणि ती लवकरच कोझिकोडला आणले जाईल. हे आयात केलेले औषध आधीच आयसीएमआरकडे उपलब्ध आहे."
भारतात निपाह व्हायरसची सुरुवातीची प्रकरणे केरळ राज्यातूनच का समोर आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर एम्स दिल्ली येथील कम्युनिटी मेडिसिनचे प्रोफेसर डॉ. संजय राय यांच्या मते, केरळमध्ये एका बाजूला जंगल आहे आणि दुसऱ्या बाजूला समुद्र आहे. दोन्हीमध्ये विविध प्रकारचे प्राणी आहेत. त्यांच्या संपर्कात आल्याने आजार पसरण्याची शक्यता वाढते. केरळमध्ये प्रत्येक घरात प्राणी पाळण्याची परंपरा आहे. दक्षिण आफ्रिकेतही तीच परिस्थिती आहे. त्याठिकाणीही असे रोज नवनवीन आजार आढळून येत आहेत.
दरम्यान, दक्षिण भारतातील केरळ राज्यात पुन्हा एकदा निपाह व्हायरसमुळे खळबळ माजली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे केरळमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, २०१८ आणि २०२१ मध्ये कोझिकोड जिल्ह्यातही निपाह व्हायरसमुळे मृत्यूची नोंद झाली होती. दक्षिण भारतात निपाह व्हायरसचा पहिला रुग्ण १९ मे २०१८ रोजी कोझिकोड जिल्ह्यात आढळून आला होता.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, निपाह व्हायरसचा संसर्ग हा प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारा एक झुनोटिक रोग आहे आणि तो दूषित अन्नाद्वारे किंवा थेट एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. बाधित लोकांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. यामुळे अनेक आजार होतात. तीव्र श्वसन संबंधी आजार आणि धोकादायक एन्सेफलायटीससह अनेक आजार होऊ शकतात. याशिवाय, हा व्हायरस डुकरांसारख्या प्राण्यांमध्ये गंभीर आजाराचे कारण होऊ शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हटले आहे.