तिरुवनंतपुरम - भाजपा ओबीसी मोर्चाचे सचिव रंजित श्रीनिवासन यांची घरात घुसून हत्या करण्यात आली. १२ तासांमध्ये झालेल्या दोन राजकीय हत्यांमुळे केरळमधीलराजकारण चांगलेच तापले आहे. या दोन हत्यांमुळे केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. परिस्थिती नियंत्रणा आणण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनीही घटनेची निंदा केली आहे.
अलप्पुझामध्ये रविवारी सकाळी भाजपा नेत्याची हत्या करण्यात आली. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव रंजित श्रीनिवासन असे असून, ते भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे सचिव होते. आज सकाळी काही लोक त्यांच्या घरात घुसले आणि त्यांनी त्यांची हत्या केली.
१२ तासांच्या आत दोन नेत्यांची हत्या झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अलाप्पुझामध्ये दोन दिवसांसाठी कलम १४४ लागू केले आहे. तर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या दोन नेत्यांच्या झालेल्या हत्येचा घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
केरळमधील सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सचिव के.एस. शान यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना उपचारांसाठी कोची येथे नेण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. एसडीपीआय नेत्याच्या हल्ल्यानंतर पक्षाध्यक्ष आणि एम.के. फैजी यांनी या प्रकरणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केला आहे.
के.एस. शान हे दुचाकीवरून घरी जात असताना एका कारने त्यांना धडक दिली. त्यानंतर के.एस. शान हे रस्त्यावर पडले. मग कारमधील काही लोकांनी त्यांची हत्या केली. गंभीर जखमी झालेल्या शान यांना सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शरीरावर ४० हून अधिक वार दिसून आले. या घटनेनंतर रविवारी सकाळी भाजपाच्या एखा नेत्याची हत्या झाली. आता या घटनेमुळे केरळमधील राजकारण तापले आहे.