नवी दिल्ली - केरळमध्ये अतिवृष्टीनंतर पूर आणि भूस्खलनामध्ये आतापर्यंत 27 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मदत आणि बचाव कार्य जोरात सुरू असून केरळमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी बोलून सर्व शक्य मदतीचे आश्वासन दिले आहे. पठाणमथिट्टाचा डोंगराळ भाग पावसामुळे-पुरामुळे अधिक प्रभावित झाला आहे. भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाची टीम मदत कार्यात गुंतलेली आहेत. तिरुअनंतपुरम, कोल्लमसह 7 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे. तर, पथानामथिट्टासह 5 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच दरम्यान एका हटके लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.
केरळमध्ये जोरदार पावसाचा कहर पाहायला मिळत असताना आपल्या लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी एका जोडप्याने चक्क टोपात बसून लग्नमंडपात जाण्याचा निर्णय घेतला. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळेच लग्नमंडपात जाणं अवघड झालं होतं. अशा वेळी या जोडप्याने एक अनोखी शक्कल लढवली आणि टोपाचा उपयोग करून मंडप गाठला. याचा एक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अनेक भागात पूरस्थिती आली आणि रस्ते पाण्याखाली
मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या कुट्टनाड भागात राहणाऱ्या राहुल आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाचा मुहूर्त काही दिवसांपूर्वीच ठरला होता. लग्नाची सर्व तयारी झाली होती. सर्व पाहुण्यांना आमंत्रणं देण्यात आलं होतं आणि कोरोनाचे नियम पाळत लग्न करण्याचं नियोजन झालं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अऩेक भागात पूरस्थिती आली आणि रस्ते पाण्याखाली गेले. लग्नाच्या दिवशी देखील मुसळधार पाऊस कोसळत होता.
पुराच्या पाण्यात टोपातून लग्नमंडपात पोहोचले
रस्त्यावर कमरेएवढं पाणी होतं. त्यामुळे कोणतंही वाहन जाऊ शकत नव्हतं. अशावेळी जोडप्याने आजच लग्न करण्याचा संकल्प केला आणि त्यासाठी शक्कल लढवली. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा एक मोठा टोप घेतला. त्यात दोघंही बसले आणि पुराच्या पाण्यात पातेल्यातून लग्नमंडपात पोहोचले. या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.