नवी दिल्ली : देशाच्या अनेक भागात कोरोनाचा विळखा सैल होताना दिसत आहे. मात्र, केरळमध्ये कोरोनाचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेत भर टाकणारा आहे. गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये दररोज सुमारे ६ हजारांच्या घरात नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात येत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधावारी संपूर्ण देशभरात ११ हजार ६६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यापैकी तब्बल ५ हजार ६५९ रुग्ण केवळ केरळमध्ये नोंदवले गेले. केरळमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रेट हा ११ टक्क्यांवर पोहोचला आहे. केरळमध्ये एकूण कोरोना बाधितांचा आकडा ०९ लाख ०५ हजार ५९१ झाला आहे. तर ०५ हजार ०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केरळमध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ०८ लाख २९ हजार ४५२ वर पोहोचला आहे.
गेल्या २४ तासांत १४ हजार ३०१ रुग्ण कोरोनामुक्त
गेल्या २४ तासांत देशात ११ हजार ६६६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून, १२३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात एकूण ०१ लाख ५३ हजार ८४७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ०१ कोटी ०७ लाख ०१ हजार १९३ वर पोहोचली आहे. तर, गेल्या २४ तासांत १४ हजार ३०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा ०१ कोटी ०३ लाख ७३ हजार ६०६ वर पोहोचला आहे.
१४७ जिल्ह्यांत सात दिवसांत कोरोना रुग्ण नाही
देशभरातील १४७ जिल्ह्यांमध्ये गेल्या सात दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तर, १८ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवासात, सहा जिल्ह्यांमध्ये गेल्या २१ आणि २१ जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसांत कोरोनाचा एकाही नव्या कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.
कोरोनाचे ७० टक्के रुग्ण महाराष्ट्र व केरळमध्ये
ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराची भारतात लागण झालेल्यांचा आकडा १५३ वर पोहोचला आहे. तर, कोरोनाचे ७० टक्के रुग्ण महाराष्ट्र व केरळमधील आहेत. देशात ०१ लाख ७३ हजार ७४० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, एकूण २३ लाख ५५ हजार ९७९ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.