कोच्ची- भारताच्या दक्षिण किनारपट्टीला ओखी या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. ओखी चक्रीवादळात तामिळनाडूतील चार आणि केरळमधील चार अशा एकूण 8 जणांना मृत्यू झाला आहे. पुढील 24 तासांत ओखी चक्रीवादळ लक्षद्वीपच्या दिशेने सरकणार आहे. या पार्श्वभूमीवर केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीप बेटावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच चेन्नई, कन्याकुमारी, तुतीकोरीन, कांचीपूरम, विल्लुपुरम, मदुराई, थनजावूर आणि थिरूवरूरमधील शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचत आले आहेत.
कोच्ची आणि लक्षद्वीप बेटासाठी नौदलाच्या दोन नौका तैनात करण्यात आल्या आहेत. वादळ आणि पावसामुळे तामिळनाडू व केरळमधील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वादळाचा तडाखा बसलेल्या भागातील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. वादळाचा जोर ओसरल्यानंतर बचावकार्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश एनडीआरएफ तसंच इतर आपातकालीन यंत्रणांना देण्यात आले आहेत. शुक्रवारी ओखी चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.
हवामान खात्याने पुढील 48 तास केरळ आणि तामिळनाडूसाठी धोक्याचे सांगितले आहेत.