पत्नीच्या भीतीमुळे पतीने अडीच मिनिटात लुटली बँक, पण कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 14:15 IST2025-02-17T14:03:05+5:302025-02-17T14:15:01+5:30
केरळमध्ये अडीच मिनिटांत बँक लुटणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी दोन दिवसांत अटक केली आहे.

पत्नीच्या भीतीमुळे पतीने अडीच मिनिटात लुटली बँक, पण कारण काय?
Kerala Bank Robbery Case: केरळमध्ये अडीच मिनिटांच्या दरोड्यात बँक लुटणाऱ्या एका व्यक्तीला रविवारी अटक करण्यात आली. ४२ वर्षीय रिजो अँटनी नावाच्या व्यक्तीने फक्त अडीच मिनिटांत बँक लुटून पळ काढला होता. रिजो अँटनी बँकेतून १५ लाख रुपये रोख चोरुन स्कूटरवरून पळून गेला होता. तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना अँटनीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. अँटनीने चौकशीत पोलिसांना चोरीचे अजब कारण सांगितले आहे.
फेडरल बँकेच्या पोट्टा शाखेत भरदिवसा चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी रविवारी रिजो अँटोनी याला अटक केली. बँकेतून १५ लाखांची चोरी करणाऱ्या अँटोनीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. पोलिसांना त्याच्या घरातून १० लाख रुपये मिळाले आहेत. चालकुडीजवळील गजबजलेल्या पोट्टा जंक्शनवर भरदिवसा झालेल्या या दरोड्याने स्थानिक रहिवाशांना धक्काच बसला. चोरट्याचा शोध घेण्यासाठी सायबर स्पेशल पथकाच्या तज्ज्ञांसह २५ अधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले होते. बँकेतील सीसीटीव्ही फुटेज आणि कर्मचाऱ्यांच्या जबाबावर पोलिसांनी तपास सुरु केला. चोरटा बनावट नंबर प्लेट असलेल्या स्कूटरवर आला होता. त्याने जॅकेट, हेल्मेट आणि हातमोजे घातले होते, अशी माहिती समोर आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये बँकेच्या बाहेर बॅकपॅक घातलेला रिजो अँटोनी दिसत होता. त्यावेळी बहुतांश कर्मचारी जेवणाच्या सुट्टीवर गेले होते. त्याने ड्युटीवर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांना वॉशरूममध्ये बंद केले. यानंतर त्याने कॅश काउंटरची काच खुर्चीच्या सहाय्याने फोडली आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला. ही संपूर्ण घटना अवघ्या अडीच मिनिटांत घडली. हल्लेखोर हिंदीत बोलत होता. कॅश काउंटरवर ४७ लाख रुपये होते. चोरट्याने १५ लाख रुपयांचे फक्त तीन बंडल काढून नेले. बँक ओळखीची असल्यासारखे तो शाखेत फिरत होता.
कशासाठी केली चोरी?
रिजो अँटोनीने आर्थिक अडचणींमुळे हा दरोडा टाकल्याचे पोलिसांना सांगितले. पत्नीने आखाती देशातून पाठवलेले सर्व पैसे रिजोने खर्च केले होते. त्यामुळे त्याच्या डोक्यावर कर्ज झालं होतं. कर्ज फेडण्यासाठी शेवटी त्याने दरोडा टाकण्याचे ठरवलं. १५ लाखांपैकी पाच लाख रुपये रिजो अँटोनीने खर्च केले होते.
रिजो अँटोनी काही वर्षांपूर्वी आखाती देशातून परतला होता. मद्यपान, ऐषोआरामाचे जीवन जगताना त्यांने पत्नीने पाठवलेले पैसे वाया घालवले होते. त्यामुळे त्याच्या डोक्यावर १० लाखांचे कर्ज झालं होतं. त्याची पत्नी पुढच्या महिन्यात घरी येणार होती. त्याला काही करुन ते कर्ज फेडायचे होते आणि म्हणूनच त्याने दरोड्याची योजना आखली. फक्त दोन आठवड्यात त्याने दरोड्याची संपूर्ण प्लॅनिंग केली होती, असं पोलिसांनी सांगितले. पोलीस या गुन्ह्यात आणखी काही लोक सामील आहेत का याचा शोध घेत आहेत.