आरोग्याच्या कामगिरीत केरळ देशात पहिले, आंध्र दुसऱ्या, तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 04:44 AM2019-06-26T04:44:02+5:302019-06-26T04:45:13+5:30
आरोग्यविषयक सर्वोत्तम कामगिरीबाबत केरळने देशात प्रथम क्रमांक पटकाविला. दुसºया तसेच तिस-या क्रमांकावर अनुक्रमे आंध्र प्रदेश व महाराष्ट्र आहेत.
नवी दिल्ली - आरोग्यविषयक सर्वोत्तम कामगिरीबाबत केरळने देशात प्रथम क्रमांक पटकाविला. दुसºया तसेच तिस-या क्रमांकावर अनुक्रमे आंध्र प्रदेश व महाराष्ट्र आहेत. या क्षेत्रातील सर्वात खराब कामगिरी उत्तर प्रदेशमध्ये आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या दुस-या आरोग्य निर्देशांक अहवालामध्ये ही स्थिती आढळून आली आहे.
देशातील २०१५-१६ (मूळ वर्ष) ते २०१७-१८ (संदर्भ वर्ष) या कालावधीत आरोग्य स्थितीचा या निर्देशांक अहवालात अभ्यास करण्यात आला. आरोग्य क्षेत्रातील २३ निकषांनुसार राज्ये, केंद्रशासित प्रदेश येथील परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला.
आरोग्यक्षेत्राचा विकास होत असलेल्या पहिल्या तीन राज्यांमध्ये हरियाणा, राजस्थान, झारखंड यांचा समावेश होतो. देशातील आरोग्य निर्देशांकाबाबत पहिल्या फेरीचा अहवाल फेब्रुवारी महिन्यात जाहीर करण्यात आला. त्यामध्ये या क्षेत्रात राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी २०१४-१५ ते २०१५-१६ या कालावधीत केलेल्या वार्षिक तसेच वाढीव विकासाची नोंद घेण्यात आली होती. जागतिक बँकेच्या मदतीने केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाने हा अहवाल तयार केला आहे.
जन्मापासून मृत्युदरापर्यंतचा अभ्यास
देशातील विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये जन्माला आल्यापासून २९ दिवसांच्या किंवा वयाच्या ५ वर्षांच्या आत किती बालकांचा मृत्यू झाला, एकूण जननदर, अशा अनेक गोष्टी आरोग्य निर्देशांक अहवाल तयार करताना तपासण्यात आल्या. अतिशय कमी वजन असलेली किती बालके जन्माला आली, जन्माला आलेल्या अपत्यांमध्ये मुलगा व मुलगी यांचे किती प्रमाण होते, अशा गोष्टींचाही बारकाईने विचार करण्यात आला. त्याचप्रमाणे आरोग्यसेवेच्या दर्जाचीही पाहणी करण्यात आली. त्यानंतर सर्वोत्तम व खराब कामगिरीनुसार राज्ये, केंद्रशासित प्रदेशांची क्रमवारी तयार करण्यात आली.