Kerala Water Metro: आता पाण्यावर धावणार मेट्रो; 25 एप्रिल रोजी PM मोदी करणार या महत्वकांशी प्रकल्पाचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 13:22 IST2023-04-23T13:20:57+5:302023-04-23T13:22:02+5:30
Kerala Water Metro: केरळमध्ये आशियातील पहिला वॉटर मेट्रोल प्रकल्प सुरू होत आहे.

Kerala Water Metro: आता पाण्यावर धावणार मेट्रो; 25 एप्रिल रोजी PM मोदी करणार या महत्वकांशी प्रकल्पाचे उद्घाटन
नवी दिल्ली: देशातील अनेक शहरात मेट्रो रेल्वे धावत आहे, तर काही शहरात मेट्रोचे काम सुरू आहे. पण, आता पाण्यावर मेट्रो धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा म्हणजेच, 25 एप्रिल रोजी केरळमध्ये भारतातील पहिल्या वॉटर मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. बऱ्याच कालावधीनंतर या मेट्रोला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. या प्रकल्पासाठी 23 वॉटर बोट आणि 14 टर्मिनल असणार असून, त्यापैकी चार टर्मिनल पूर्णत: सुरू झाले आहेत. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशियामध्ये प्रथमच वॉटर मेट्रो चालवली जात आहे.
रविवारी अधिकृतपणे माहिती देताना सांगण्यात आले की, कोची वॉटर मेट्रो (KWM) ही सेवा सुरू झाल्याने शहरातील नागरिकांच्या वाहतुकीत सुसूत्रता येणार आहे. कोचीसारख्या शहरात वॉटर मेट्रो खूप उपयुक्त आहे. ही कमी किमतीची मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम असून प्रवास सुलभ होणार आहे. कोची आणि त्याच्या आसपासच्या 10 बेटांना जोडणारा हा केरळचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
कोची हा केरळमधील सर्वात दाट लोकसंख्येचा जिल्हा आहे आणि अशा प्रकारे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि कोची सरोवराच्या किनाऱ्यावर सहज प्रवेश देण्यासाठी वाहतुकीच्या नवीन पद्धतींची कल्पना करण्यात आली आहे. वॉटर मेट्रो प्रकल्प 78 किलोमीटरमध्ये पसरलेला असून तो 15 मार्गांवरून जाणार आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी 'कोची वॉटर मेट्रो' हा राज्याचा 'महत्त्वाकांक्षी प्रकल्प' असल्याचे म्हटले आहे. यामुळे कोची बंदर शहराच्या विकासाला आणि वाढीला गती देईल.