वायनाडमध्ये जीवघेण्या पावसात भूस्खलन, १९ मृतदेह हाती; शेकडो ढिगाऱ्याखाली अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 09:38 AM2024-07-30T09:38:29+5:302024-07-30T09:46:44+5:30
Wayanad Landslides : केरळमधील वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर झालेल्या भीषण भूस्खलनाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
Kerala Wayanad Landslides : केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसात भूस्खलन झाले आहे. केरळच्या वायनाड जिल्ह्यात भूस्खलनाच्या अनेक घटनांमध्ये मृतांची संख्या १९ झाली आहे. याशिवाय शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वायनाडमधील मेपड्डीच्या काही डोंगराळ भागात ही भूस्खलन झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची माहिती घेत दुःख व्यक्त केलं आहे. मृताच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून दोन लाखांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास मेप्पडीजवळील डोंगराळ भागात भूस्खलन झाल्यामुळे मलप्पुरममधील निलांबूर परिसरातून वाहणाऱ्या चालियार नदीत पूर आला. त्यामुळे वायनाडमधील मेप्पडी पंचायत अंतर्गत मुंडक्काई आणि चुरलमाला गावात अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे. या अपघातात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. चुरलमळा येथे एका बालकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर ठोंडरनाड गावात एका नेपाळी कुटुंबातील एका वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारतीय वायुसेनेचे दोन हेलिकॉप्टर कोईम्बतूरमधील सुलूर येथून वायनाडसाठी रवाना झाले आहेत. याशिवाय भारतीय लष्कराच्या संरक्षण सुरक्षा दलाच्या दोन बटालियन कन्नूरहून वायनाडला गेल्या आहेत.
वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त करतो, असे पंतप्रधान म्हणाले. जखमींसाठी पंतप्रधानांनी देवाकडे प्रार्थना केली आहे. पंतप्रधानांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशीही बोलून केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधानांनी मंत्री जॉर्ज कुरियन यांच्याशीही चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी भूस्खलनात मृत झालेल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मंगळवारी सकाळी चाळीयार नदीला आलेल्या पुरामुळे निलांबूरजवळील पोथुकल गावातील अनेकांचे मृतदेह वाहून गेले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मुलासह तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अजून काही लोकांचे मृतदेह रौद्ररुप धारण केलेल्या नदीत तरंगत असल्याची माहिती मिळाली आहे.