वायनाड येथील भूस्खलनामधील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ, लष्कर आणि NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 09:29 PM2024-07-30T21:29:50+5:302024-07-30T21:30:12+5:30
Kerala Wayanad Landslide: केरळमधील वायनाड जिल्ह्यात भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच मृतांचा आकडा १०० च्या वर गेला आहे.
केरळमधील वायनाड जिल्ह्यात भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन वायनाडमधील मेपाड्डी, मुंडक्कल आणि चूरलमाला परिसरामधील अनेक घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच मृतांचा आकडा १०० च्या वर गेला आहे. तसेच बचावकार्य जसजसं पुढे जात आहे, तसतशी मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे.
भूस्खलनामुळे या भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. या भीषण दुर्घटनेमुळे केरळ सरकारने दोन दिवसांच्या शोकाची घोषणा केली आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक दबलेले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि कुत्र्यांची मदत घेतली जात आहे.
केरळमधील वायनाडमध्ये पहिल्यांदाच एवढी भीषण आपत्ती आली आहे. कालपर्यंत हिरवळ असलेल्या ठिकाणी सध्या सगळीकडे चिखल आणि मातीचं साम्राज्य दिसत आहे. तर जिथे घरं आणि वस्ती होती. तिथे आता केवळ अवशेष दिसत आहेत. वायनाडमधील बचाव कार्यात तिन्ही सैन्यदलांचे जवान गुंतले आहेत. हवाई दलाने राज्य सरकार आणि एनडीआरएफच्या मदतीसाठी एक एमआय-१७ आणि एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर तैनात केलं आहे. तर लष्कर आणि नौदलाचे पाणबुडेही बचाव कार्यामध्ये गुंतले आहेत.