Wayanad Landslides: केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसादरम्यान झालेल्या भूस्खलनाच्या घटनेत 100 हून अधिक लोक अडकल्याचे वृत्त आहे. येथे मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला असून यात काही मुलांचाही समावेश आहे. याशिवाय या भीषण भूस्खलनात जवळपास 200 घरांचे नुकसान झाल्याचे समजते. तसेच, मुसळधार पावसामुळे रस्ते आणि पूलही खचले आहेत. तर एका नदीत मृतदेह वाहून जातानाही दिसून आल्याची घटना घडली आहे.
केरळमधील वायनाडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सुमारास 4 तासांत 3 मोठ्या भूस्खलनाच्या घटना घडल्या. मुंडक्कई, चुरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या गावांना भूस्खलनाचा मोठा तडाखा बसला आहे. या गावांमधील शेकडो घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. एकट्या चुरलमाला येथेच 200 घरांना या दूर्घठनेचा तडाखा बसला आहे.
नदीत वाहतांना दिसले 6 मृतदेह -मनोरमा न्यूजने स्थानिक लोकांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अट्टामाला मधील लोकांना नदीमध्ये 6 मृतदेह वाहतांना आढळून आले आहेत. तर, शेकडो लोक अद्यापही बेपत्ता आहेत. या भूस्खलनाचा सर्वाधिक फटका हा चुरलमालाला बसला आहे. येथे घरांच्या बाहेर असलेली वाहने, दुकाने आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा -या प्रचंड भूस्खलनात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर वायनाडला रवाना झाले आहेत. या दूर्घटनेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली आहे. याशिवाय जखमींनाही 50 हजार रुपये जाहीर केले आहेत.