केरळच्या तरुणाला 25 कोटींची लॉटरी जिंकल्याचा पश्चाताप; दररोज हा त्रास सहन कारावा लागतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 01:56 PM2023-02-23T13:56:46+5:302023-02-23T13:57:37+5:30
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 31 वर्षीय अनुपने 25 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली, पण त्याला आता पश्चाताप होतोय.
Kerala Lottery News : गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 31 वर्षीय अनुप एम या तरुणाने 25 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली होती, परंतु आता त्याला लॉटरी जिंकल्याचा पश्चाताप होतोय. लॉटरी जिंकल्यापासून त्याला सातत्याने लोक आर्थिक मदतीची मागणी करत आहेत. या लोकांमुळे त्रस्त झाल्याचे अनुपने सांगितले. अनुप सध्या राज्य सरकारच्या लॉटरी व्यवसायात काम करतो आणि केरळमधील एकमेव करोडपती लॉटरी एजंट आहे.
अनूप आधी ऑटो ड्रायव्हर होता, पण आता तो केरळ स्टेट लॉटरीच्या अनुक्रमांकांची यादी करण्यात आणि ग्राहकांना त्यांची तिकिटे विकण्याचे काम करतो. त्याच्या नवीन लॉटरी शॉप एम ए लकी सेंटरमध्ये त्याचा आयफोन सतत त्याच्या कानावर असतो, कारण त्याला सतत ग्राहकांचे कॉल येत असतात. आज तो राज्यातील सर्वात व्यस्त लॉटरी एजंट आहे.
लॉटरी जिंकल्यानंतर अनेक समस्या आल्या
अनुप हा केरळच्या लॉटरी इतिहासात सर्वात मोठा लॉटरी विजेता आहे. लॉटरी जिंकल्यापासून त्याला अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. त्याला सतत कोणी ना कोमी आर्थिक मदत मागायला येतो. लोकांनी त्याच्या घरी गर्दी करू नये म्हणून तो सतत आपले निवासस्थान बदलत असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून लोकांची गर्दी कमी झाली आहे.
केरळ सरकारच्या लॉटरी व्यवसायातील मोठा चेहरा
अनूप आता केरळ सरकारच्या मालकीच्या लॉटरी व्यवसायाचा एक मोठा चेहरा बनला आहे. केरळ सरकारचा हा व्यवसाय आता दररोज अनेकांना करोडपती बनवत आहे. केरळ लॉटरी विभागाकडे एक लाखांहून अधिक नोंदणीकृत एजंट आहेत. त्यांच्या अंतर्गत अनेक नोंदणी नसलेले सब-एजंट आणि फेरीवाले आहेत, ज्यामुळे राज्यातील अनेक लाख लोकांना रोजगार मिळतो.