कोची : केंद्राकडून पुरविण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसींपैकी एकही लस वाया जाऊ न देण्याचा, तसेच मिळालेल्या लसींपेक्षा अधिक लोकांना लस देण्याचा विक्रम केरळने केला आहे. या कामगिरीमध्ये त्या राज्यातील नर्सेसचा सिंहाचा वाटा आहे. केंद्र सरकारने एक मेरोजी यासंदर्भात आकडेवारी जाहीर केली. केरळने एकही लस वाया न घालविण्याची कामगिरी केली. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे अभिनंदन केले आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, केंद्राकडून केरळला कोरोना लसीचे ७३ लाख ३८ हजार ८०६ डोस मिळाले होते. मात्र त्यांनी त्यातून ७४ लाख २६ हजार १६४ नागरिकांचे लसीकरण केले. म्हणजे ८७ हजार ३५८ अतिरिक्त नागरिकांना डोस दिले. प्रत्येक वायलमध्ये १० डोस असतात. त्याव्यतिरिक्त त्यात एखादा डोस ज्यादा असतो, ज्याचा लस सिरिंजमध्ये भरताना अपव्यय होऊ शकतो. मात्र केरळमधील नर्सेसनी सूक्ष्म नियोजन व दक्षतेने काम करून ते काही डोस वाचविले व नागरिकांना दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना लसी अजिबात वाया न जाऊ देण्याची केरळने कामगिरी केली असून देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.