गांधींच्या आत्मकथनाला केरळमध्ये सर्वाधिक मागणी, विविध भाषांत ५७.७४ लाख प्रतींची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 04:30 AM2019-10-01T04:30:57+5:302019-10-01T04:31:16+5:30
गुजरात ही महात्मा गांधींची जन्मभूमी असली तरी ‘सत्याचे प्रयोग’ या त्यांच्या आत्मकथेला केरळमध्ये सर्वाधिक मागणी आहे.
अहमदाबाद : गुजरात ही महात्मा गांधींची जन्मभूमी असली तरी ‘सत्याचे प्रयोग’ या त्यांच्या आत्मकथेला केरळमध्ये सर्वाधिक मागणी आहे. आत्मकथनाच्या मल्याळम अनुवादाच्या ८.२४ लाख प्रती तर गुजरातीतील ६.७१ लाख प्रती आजवर विकल्या गेल्या
आहेत.
सत्याचे प्रयोग या आत्मकथनाची गुजराती भाषेतील मूळ आवृत्ती १९२७ साली प्रकाशित झाली. या पुस्तकाचा मल्याळी भाषेत १९९७ साली अनुवाद झाला.
नवजीवन ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त विवेक देसाई यांनी सांगितले की, केरळमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. तेथील शाळा, महाविद्यालयांमध्ये पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. गुजरातपेक्षा केरळमध्ये वाचनसंस्कृती अधिक बहरली आहे. त्यामुळेच सत्याचे प्रयोगच्या मल्याळी अनुवादाला तिथे जास्त प्रतिसाद मिळाला.
महात्मा गांधींच्या आत्मकथनाचे विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यातील इंग्रजी अनुवादाच्या आजवर सर्वाधिक २०.९८ लाख प्रती विकल्या गेल्या. त्याखालोखाल मल्याळम, त्यानंतर तामिळ (७.३५ लाख), हिंदी (६.६३ लाख) भाषांतील अनुवादांची विक्री झाली.
या आत्मकथनाचा मराठी, आसामी, उडिया, मणिपुरी, पंजाबी, कन्नड, संस्कृत अशा अनेक भाषांतही अनुवाद झाला असून एकूण ५७.७४ लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.
महात्मा गांधींचे आत्मकथन ५०० पानांचे असून त्याची किंमत ८० रुपये आहे. या पुस्तकाचा २०१४ साली पंजाबी भाषेत अनुवाद झाल्यानंतर २० हजार प्रतींची विक्री झाली होती.
डोग्री भाषेत १९६८ साली महात्मा गांधींचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले व हजार प्रती विकल्या गेल्या. आता डोग्रीतील नवी आवृत्ती काढण्याचे प्रकाशकांनी ठरविले आहे. बोडो भाषेतही अनुवादाचे काम सुरू
आहे. (वृत्तसंस्था)
गांधीजींना मंदिरबंदी
महात्मा गांधींच्या आत्मकथनाच्या सर्वात जास्त प्रती केरळमध्ये विकल्या गेल्या असल्या तरी १९२५ साली त्यांना कन्याकुमारी येथील भगवती देवीच्या मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. ब्रिटिश राजवटीत कन्याकुमारी हे केरळच्या त्रावणकोर संस्थानचा एक भाग होते.
इंग्लंडचा दौरा करून गांधीजी परतले होते. सागरी प्रवास करून विदेशात जाणे हे पुजाऱ्याच्या लेखी ‘पाप’ असल्याने त्याने महात्मा गांधींना मंदिरात प्रवेशबंदी केली होती.