तिरूवानंतपुरम : श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घातली गेल्यानंतर भारतात सुद्धा याच मुद्दयावरुन वाद सुरु असताना केरळमध्ये एका मुस्लिम एज्युकेशन सोसायटीकडून शाळा, महाविद्यालयात बुरखा बंदी करण्यात आली आहे. यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यातील कालिकत येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीने (एमईएस) 17 एप्रिलपासूनच यासंबंधीचे पत्रक जारी केले आहे. या पत्रकानुसार, संस्थेच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात बुरखा परिधान करण्यास बंदी घातली आहे. दरम्यान, केरळमधील काही संघटनानी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.
श्रीलंकेतील आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकन सरकारकने बुरखा बंदी घातली आहे. या निर्णयानंतर भारतात सुद्धा अशी मागणी होत असून त्याला विरोधही होत आहे. नुकतेच 'सामना' या मुखपत्रातील संपादकीयमधून बुरखा आणि नकाबबंदीची मागणी केली होती. मात्र, नंतर ही वर्तमानपत्राची व्यक्तिगत भूमिका असल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले होते.
‘उद्या तुम्ही आमच्या दाढी, टोपीलाही आक्षेप घ्याल’बुरखा बंदीच्या या मागणीला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी विरोध केला आहे. निवडीचा अधिकार हा राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे. तुम्ही हिंदुत्व सर्वांवर थोपवू शकत नाही. उद्या तुम्ही आमच्या दाढीला आणि टोपीलाही आक्षेप घ्याल. कोणी काय कपडे घालावे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने तसा निकाल दिला आहे. वैयक्तिक गोपनीयता हा देशातील नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे बुरखा घालण्यावर कोणीही बंदी आणू शकत नाही. बुरखाबंदी करणे घटनाविरोधी आहे. हिंदुत्ववादी शक्तींना राज्यघटना नको आहे. शिवसेना त्यातीलच एक पोपट आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांनी कधी बुरखा घातला होता का, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.